जीवितहानी टळली, फांद्या हटवून मार्ग केला मोकळा
वार्ताहर /उचगाव
उचगाव नागेशनगरमधील श्रीराम चौकातील पिंपळाचा मोठा वृक्ष सोमवार दि. 1 जुलै रोजी सव्वा बाराच्या सुमाराला अकस्मात कोसळला आणि साडेबाराला बाजूलाच असलेली शाळा सुटल्यानंतर मुले बाहेर आली. मुलांना ने-आण करण्यासाठी थांबणाऱ्या रिक्षा, पालक या सर्वांवर होणारा मोठा अनर्थही टळल्याने सर्वांनी देवाचे आभार मानले. नागेशनगर भागात ये-जा करण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्याच्या एका भागात श्रीराम चौक असून यामध्ये मोठे पिंपळाचे झाड आहे. झाडाभोवती पाराही बांधण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सदर वृक्ष दिमाखात उभा होता. मात्र सोमवारी हा वृक्ष मुळासकट रस्त्यावर उन्मळून कोसळल्याने सर्वांचेच धाबे दणाणले.
या चौकाला लागूनच होली पॅमिली स्कूल आहे. सदर स्कूल सकाळी नऊ ते साडेबारापर्यंत चालू असते. ही शाळा सुटल्यानंतर ही मुलं या झाडाखालूनच पुढे जातात. या झाडासभोवती मुलांना ने-आण करण्यासाठी रिक्षा थांबलेल्या असतात. पाल्यांना घेऊन जाण्यासाठी पालकांचीही गर्दी असते. मात्र शाळा सुटण्यास पंधरा मिनिटे उशीर असल्याने सदर झाडाखाली कोणी नव्हते. म्हणून अनेकांचे जीव वाचले. अन्यथा रिक्षा या झाडाखाली सापडून मोठे नुकसान झाले असते. सदर वृक्ष रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने नागेशनगरमध्ये मार्ग बंद झाला होता. यावेळी विष्णू लोहार, परशराम पुन्हाजीचे, पांडू देसाई, अमर लोहार या युवकांनी तातडीने या वृक्षाच्या फांद्या छाटून रस्ता मोकळा करून दिला.









