जयसिंगपूर येथे जागतिक दर्जाची बाजारपेठ; पन्हाळयात आरळे रेशीम धागा निर्मिती केंद्र
अहिल्या परकाळे कोल्हापूर
राज्य वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत रेशीम शेतीला अनुदान देऊन प्रत्येक जिल्ह्यात एक बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देऊन बहुतांश शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पाच हजार मेट्रिक टन रेशीम धागा निर्मिती केली जाते. रेशीम कोष 80 हजार ते 1 लाख 35 हजार रुपये क्विंटल दराने विकले जातात. त्यामुळे राज्यात 6 हजार 500 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 461 शेतकरी रेशीम शेती करून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. सोमवार (दि. 1) असलेल्या कृषी दिनानिमित्त रेशीम शेतीच्या नव्या प्रवाहाचा घेतलेला आढावा.
पश्चिम महाराष्ट्रात जास्तीतजास्त ऊस किंवा सोयाबिनची शेती केली जाते. तेच तेच पीक घेऊन जमिनीचा कसही कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अलीकडे तोटाच होताना दिसतो. म्हणून राज्य वस्त्रोद्योग मंत्रालय मनरेगा योजनेअंतर्गत रेशीम शेतीला दरवर्षी 4 लाख 18 हजार रुपये अनुदान देते. तुती लागवड, कीटक व आळ्यांचे संगोपनासाठीच्या शेडला 100 टक्के अनुदान मिळते. तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता कशी वाढवायची यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते. दरवर्षी अनुदानात वाढ होत आहे. जागतिक पातळीवर रेशीम शेतीचे उत्पादन घटले आहे. परिणामी जागतिक बाजारपेठेत भारतातील रेशीम धाग्याला चांगला दर मिळतोय. त्यामुळे देश, राज्य पातळीवर रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे. राज्य शासनाने रेशीम कोष विक्रीसाठी जयसिंगपूर येथे बाजारपेठ निर्माण करून दिली आहे. तर पन्हाळा तालुक्यात आरळे गावात रेशीम धागा निर्मिती केंद्र, गडहिंग्लजमध्ये अंडीपुंज विक्री केंद्र स्थापन केले आहे.
भविष्यात इचलकरंजी येथे धागा निर्मिती केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. आपल्याच जिल्ह्यात सर्व सुविधा उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचा धागा येथे निर्माण होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना आता बेंगळूर किंवा म्हैसूरच्या बाजारपेठेत जावे लागणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यात 837 शेतकऱ्यांनी यशस्वीपणे रेशीम शेती केली आहे. त्यांचे उत्पन्न पाहून इतर 624 शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यासाठी शासनाकडे नावनोंदणी केली आहे. कारण ऊस 350 रुपये क्विंटल तर सोयाबिन 4 ते 5 हजार रुपये क्विंटलने जाते. त्यापेक्षा रेशीम शेती करून 1 लाख 35 हजार रुपये क्विंटलने कोष विक्री परवडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अंडीपुंज केंद्राने केले लक्ष्य पूर्ण
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे महाराष्ट्रातील एकमेव अंडीपुंज निर्मिती केंद्र आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर येथून अंडीपुंज वितरीत केले जाते. या केंद्राने गतवर्षी 22 लाख अंडीपुंजी विक्री केली असून यंदा शासनाने 30 लाखाचे लक्ष दिले आहे. शेतकऱ्यांची संख्या वाढत असल्याने त्यापेक्षा जास्त अंडीपुंजची विक्री होण्याची शक्यता आहे.
नवनवीन वाण निर्मिती
रेशीम आळ्यांच्या जाती, तुतीचे नवनवीन वाण निर्मिती होत आहे. त्यामुळे रेशीम कोष व रेशीम धाग्याची गुणवत्ता वाढत असून आपोआपच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. शासनाकडूनही शेतकऱ्यांना वारंवार प्रोत्साहनपर अनुदान आणि रेशीम कोष व धागा विक्रीच्या दरात वाढ दिली जात आहे.
शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण
महाराष्ट्र शासनाच्या वतीने रेशीम शेतीसंदर्भात शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण दिले जातेच. पण शिवाजी विद्यापीठानेही रेशीम उद्योग पदविका अभ्यासक्रम सुरू केला असून शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत केली जाते. या अभ्यासक्रमांतर्गत शेकडो शेतकऱ्यांनी रेशीम अंडीपुंज, कोष आणि धागा बनवण्यापासून ते विक्रीपर्यंतचे तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. याचा उत्पन्न वाढीसाठी उपयोग झाल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
वर्षाला चार लाखाचा नफा
रेशीम उद्योगाला 4 लाख 18 हजार शासकीय अनुदान मिळते. वर्षातून सात ते आठवेळा उत्पन्न घेतले जाते. शेणखत, लेंडीखत वापरून सेंद्रीय पध्दतीने कमी खर्चात शेती करतो. दरवर्षी खर्च जाता एकरी साडेतीन लाख ते चार लाख रुपयांचा नफा होतो. एकदा तुतीची लागवड केली की 15 वर्ष लागवड करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे पारंपरिक ऊस शेती न करता गावातील 30 शेतकरी रेशीम शेती करतात.
तानाजी पाटील (बेले, ता. करवीर)