वृत्तसंस्था/ ईस्ट रुदरफोर्ड, अमेरिका
88 व्या मिनिटाला रिबाऊंड झालेल्या चेंडूवर लॉटेरो मार्टिनेझने गोल नोंदवल्यामुळे विद्यमान विजेत्या अर्जेन्टिनाने चिलीवर 1-0 असा विजय मिळवित कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
लायोनेल मेस्सीचा कॉर्नर किक चिलीचा गोलरक्षक क्लॉडिओ ब्राव्हो ब्लॉक करताना रिबाऊंड झाला. त्यावर ताबा घेत मार्टिनेझने अर्जेन्टिनाला आघाडी मिळवून दिली. त्याचा हा या स्पर्धेतील दुसरा तर राष्ट्रीय संघासाठी नोंदवलेला 26 वा गोल होता. हा गोल व्हिडिओ रिव्ह्यू पाहिल्यानंतर निश्चित करण्यात आला. त्यामुळे तीन मिनिटे खेळाडूंना प्रतीक्षा करावी लागली. या विजयानंतर अर्जेन्टिनाने गट अ मध्ये 6 गुणांसह आघाडीचे स्थान घेतले आहे, दुसरे स्थान मिळविणाऱ्या कॅनडाचेही 6 गुण झाले आहेत तर चिली व पेरू यांचा प्रत्येकी एक गुण झाला आहे. अर्जेन्टिनाचा पुढील सामना शनिवारी पेरूविरुद्ध मियामी गार्डन्स येथे तर त्याच दिवशी कॅनडा व चिली यांची लढत फ्लोरिडातील ओरलँडो येथे होईल.
या सामन्याला मेस्सीचा खेळ पाहण्यासाठी 81 हजारहून अधिक शौकिनांनी गर्दी केली होती. नुकताच 37 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर खेळणाऱ्या मेस्सीनेही शानदार प्रदर्शन करीत आपली गुणवत्ता दाखवून देत त्यांना खुश केले. मेटलाईफ स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अर्जेन्टिनाने शॉट्स मारण्याच्या बाबतीत चिलीवर 21-3 असे वर्चस्व गाजवले तर कॉर्नर किक्समध्येही अर्जेन्टिना 11-0 अशी सरस ठरली. 72 व्या मिनिटापर्यंत चिलीला गोलच्या दिशेने फटका मारता आला नव्हता. 36 व्या मिनिटाला मेस्सीला गोल करण्याची चांगली संधी मिळाली होती. त्याने 30 यार्डावरून ग्लान्स केलेला फटका ब्राव्होच्या डावीकडे गोलपोस्टला लागून बाहेर गेल्याने त्याची ही संधी हुकली. त्याआधी 24 व्या मिनिटाला गॅब्रियल सुआझोचा पाय उजव्या मांडीवर जोरात बसल्याने मेस्सीला त्यावर उपचार करून घ्यावे लागले. 72 व्या व 76 व्या मिनिटाला एचेव्हेरियाचे फटके अर्जेन्टिनाच्या गोलरक्षकाने थोपवल्याने चिलीच्या दोन संधी वाया गेल्या. या स्टेडियमवर 2016 कोपा अमेरिका अंतिम फेरीत चिलीने अर्जेन्टिनाला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरविले होते.
चिलीचा 41 वर्षीय गोलरक्षक हा या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडू असून त्याने या सामन्यात आठवेळा अप्रतिम बचाव केला. त्याचा हा 150 वा आंतरराष्ट्रीय सामना होता.
कॅनडाची पेरूवर मात
कान्सास सिटी येथे झालेल्या अन्य एका सामन्यात कॅनडाने पेरूवर 1-0 अशी मात केली. गेल्या 24 वर्षात कॅनडाने पेरूवर मिळविलेला हा पहिलाच विजय आहे. 74 व्या मिनिटाला जोनाथन डेव्हिडने एकमेव विजयी गोल नोंदवला. 59 व्या मिनिटाला जेकब शॅफेलबर्गवर रफ टॅकल केल्याने पेरूच्या मिग्वेल अॅरॉजोला रेड कार्ड दाखवून बाहेर घालविण्यात आले. त्यामुळे उर्वरित खेळात पेरूला दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. डेव्हिडने नोंदवलेला गोल हा त्याने कॅनडासाठी नोंदवलेला 27 वा गोल नव्हता. या सामन्यावेळी सहायक पंचाला भोवळ येऊन पडल्याने त्याच्यावर मैदानातच उपचार करण्यात आले. कोपा अमेरिका स्पर्धेत कॅनडा प्रथमच खेळत असून पहिल्या सामन्यात त्यांना अर्जेन्टिनाकडून 2-0 असा पराभव केला होता.