रस्त्यावर मोठमोठे खड्डे : वाहनचालकांची कसरत
वार्ताहर /धामणे
नंदिहळ्ळी ते गर्लगुंजी हा अडीच किलो मीटरचा रस्ता अत्यंत खराब होवून रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने या रस्त्याने ये-जा करणाऱ्या सर्वच वाहनचालकांना वाहन चालवतेवेळी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही? अशी विचारणा वाहनचालकांकडून होत आहे. गेल्या तीन वर्षापूर्वी मुसळधार पावसाने हा नंदिहळ्ळी ते गर्लगुंजी रस्त्याचा नंदिहळ्ळी गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर वाहून गेला होता. त्यामुळे मोठी अवजड वाहने या रस्त्याने जाणे-येणे बंद होती. परंतु वाहनांची होणारी अडचण लक्षात घेवून नंदिहळ्ळी ग्राम पंचायतीने वाहुन गेलेल्या रस्त्याला हार्डमुरूमचे भराव घालून वाहनधारकांना थोडा दिलासा मिळवून दिला होता. परंतु गेल्या दोन वर्षात या रस्त्याच्या दुरुस्तीबद्दल कोणतेच पाऊल उचलले नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षात पावसामुळे आणि वाहनांच्या रहदारीमुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी वाहन तर चालविणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे. चारचाकी वाहन कासवाच्या गतेने चालवूनसुद्धा वाहन नादुरूस्त होत असल्याने दिवसातून दोन तीन वाहनधारक आपली वाहने या रस्त्यावर सोडून जाण्याची वेळ येत आहे. त्याचप्रमाणे हा रस्ता वाहून गेलेल्या ठिकाणी एक चारचाकी वाहन पास होईल इतकाच अरूंद रस्ता झाल्याने एक वाहन आले की विरूध्द दिशेने येणाऱ्या वाहनाला पुढे जाण्यास कठीण जात आहे.
पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची गरज
नंदिहळ्ळी-गर्लगुंजी अंतर अडीच किलोमीटर असून हा रस्ता तातडीने पावसाळ्यापूर्वी दुरुस्त केला नाहीतर या रस्त्याने वाहने हाकणे कठीण होणार आहे. त्यामुळे नंदिहळ्ळी-गर्लगुंजी जायचे झाल्यास व्हाया राजहंसगडमार्गे 7 किलोमीटर अंतर कापून जावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी नंदिहळ्ळी ते गर्लगुंजी हा रस्ता तातडीने दुरुस्त करून या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी या भागातील नागरिक शासनाकडे व या भागाच्या लोकप्रतिनिधींकडे करीत आहेत.









