फटाके फोडून, मिठाई वाटप करून साजरा केला आनंद
बेळगाव : नवी दिल्लीत संसद भवनमध्ये सोमवारी प्रियांका जारकीहोळी यांनी खासदारपदाची शपथ घेतली. दरम्यान, हा क्षण त्यांचे चाहते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी टीव्ही, मोबाईल आणि एलईडी पडद्यावर पाहिला. प्रियांका जारकीहोळी खासदारपदी शपथबद्ध होताच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव आणि चिकोडीत फटाके फोडून आनंद साजरा केला. चिकोडी मतदारसंघात भाजपचे आण्णासाहेब जोल्ले यांच्याविरुद्ध प्रियांका जारकीहोळी यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. सोमवारी संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांनी खासदारपदाची शपथ घेतली.
या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि चाहत्यांनी बेळगावमधील काँग्रेस भवन आणि चिकोडीतील काँग्रेस कार्यालयासमोर फटाके फोडले, मिठाई वाटप करून आनंद साजरा केला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी यांनी 27 व्या वर्षीच लोकसभेवर निवडून जाण्याची कामगिरी केली आहे. त्यांनी खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर बेळगाव, चिकोडीसह राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विविध भागातील मठाधीशांकडून अभिनंदन केले जात आहे.









