जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती
बेंगळूर : बेळगावमधील नव्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती आणि वैद्यकीय उपकरणे पुरविण्यासंबंधी वैद्यकीय शिक्षण खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा केली आहे. कर्मचारी नेमणूक आणि उपकरणांची तरतूद झाल्यानंतर लवकरच हे हॉस्पिटल सुरू केले जाईल, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.बेंगळूरमधील विकाससौध येथे वैद्यकीय मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या (बिम्स) विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली.यावेळी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, बिम्स आवारात 188 कोटी रुपये खर्चून बांधलेले सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच सुरू होणार आहे. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी वर्षाला 38 कोटी ऊपये अनुदानाची आवश्यकता आहे. याकरिता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून मंजुरी घेतली जाईल.
या इस्पितळासाठी आवश्यक अ आणि ब श्रेणीतील 570 कर्मचारी नियुक्त करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, एंडोक्राईनोलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, नेफ्रोलॉजी आणि सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी यासह इतर आरोग्यविषयक सेवा देण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची सुविधा असणार असून या नवीन हॉस्पिटलद्वारे दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांच्याशी बिम्सच्या आवारात नर्सिंग हॉस्टेल आणि 450 बेड्स क्षमतेचे प्रशिक्षण हॉस्पिटलची इमारत बांधण्याबाबत चर्चा केल्याची माहिती मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. याचवेळी त्यांनी बिम्सच्या विकासाला गती देऊन कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी बिम्सचे संचालक अशोककुमार शेट्टी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. सिद्दू हुल्लोळी यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.









