वृत्तसंस्था/ नॉर्थ साऊंड
गुरुवारी येथील सर व्हिव्हिएन रिचर्डस स्टेडियमवर आयोजित केलेल्या एका समारंभात 2023 सालातील आयसीसीच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूचा बहुमान ऑस्टेलियाचा अष्टपैलू पॅट कमिन्सने मिळविला आहे. दरम्यान ऑस्टेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या हस्ते कमिन्सला हा पुरस्कार देण्यात आला.
आयसीसीच्या हॉल ऑफ फेमचा मानकरी तसेच 2006 आणि 2007 साली आयसीसीच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूचा बहुमान मिळविणाऱ्या रिकी पाँटिंगने कमिन्सच्या कामगिरीचे कौतुक केले. 2023 च्या क्रिकेट हंगामामधील पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियन संघाला अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकून दिल्या. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि वनडे संघाचे नेतृत्वही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सकडे सोपविले. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करुन अजिंक्यपद मिळविले तर अहमदाबादमध्ये झालेल्या 2023 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने भारताचा अंतिम सामन्यात पराभव केला होता.
2023 च्या क्रिकेट मोसमात कमिन्सने कसोटी क्रिकेटमध्ये 27.50 धावांच्या सरासरीने 42 गडी बाद केले. तसेच त्याने फलंदाजीत 254 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियन संघाच्या विश्वचषक स्पर्धेतील यशाचे सर्व श्रेय कमिन्सला द्यावे लागेल. 2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कमिन्सने 128 धावांत 15 गडी बाद केले. तसेच त्याने फलंदाजीत 128 धावा जमविल्या. 2024 च्या वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अजिंक्यपद पटकाविले. 31 वर्षीय पॅट कमिन्सने 2024 च्या क्रिकेट हंगामात आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 25.64 धावांच्या सरासरीने 17 गडी बाद केले असून फलंदाजीत त्याने 157 धावा जमविल्या. कमिन्सने टी-20 प्रकारात 8 पेक्षा कमी धावांच्या सरासरीने 5 गडी बाद केले आहेत.









