भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळही वाढण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते जे. पी. नड्डा यांना राज्यसभेतील सभागृह नेतेपदाची जबाबदारी मिळू शकते. एवढेच नाही तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ आणखी 6 महिन्यांनी वाढवला जाऊ शकतो. सध्याचा त्यांचा कार्यकाळ चालू महिनाअखेरीस संपत आहे. परंतु या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या चार राज्यांतील निवडणुका पूर्ण होईपर्यंत किंवा नव्या अध्यक्षाच्या निवडीपर्यंत त्यांना पदावर राहण्यास सांगितले जाऊ शकते. सर्व राज्यांपैकी 50 टक्के संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाते. ही प्रक्रिया सुमारे सहा महिने चालू राहणे अपेक्षित आहे, असे पक्षाचे कायदे सांगतात. अशा स्थितीत डिसेंबर-जानेवारीमध्ये नव्या अध्यक्षाची निवडणूक होऊ शकते.
जे. पी. नड्डा हे गुजरातचे राज्यसभेचे खासदार आहेत. पीएम मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान दिले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाव्यतिरिक्त त्यांच्याकडे रसायन आणि खते मंत्रालयाचाही कार्यभार सोपवण्यात आला आहे. मोदी सरकार 1.0 मध्येही नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दरम्यान, भाजपने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींच्या नावांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, हरियाणासाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, झारखंडसाठी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री जी. किशन रे•ाr यांची जम्मू-काश्मीरचे राज्य निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.