मृत यात्रेकरूंची संख्या हजारांवर : भारतीयांचाही समावेश
वृत्तसंस्था /रियाध
मुस्लिमांचे पवित्र स्थळ असलेल्या मक्का येथील हाज यात्रेत उष्णतेच्या लाटेमुळे मृत झालेल्या यात्रेकरूंची संख्या 1 हजाराच्या वर पोहचली आहे. बहुतेकांचा मृत्यू उष्माघाताच्या विकाराने झाला असल्याचे मक्केच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. काही भारतीयांचाही मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये निम्म्याहून अधिक भाविक अनोंदणीकृत आहेत. सर्वाधिक 658 मृत ईजिप्तमधील आहेत. सध्या मक्केतील तापमान 51.8 अंश सेल्सिअस इतके आहे. येथे तापमानात प्रतिवर्ष 0.4 अंश सेल्सिअसची वाढ होत आहे. उष्म्याची परिस्थिती अननुकूल आहे. त्यामुळे कोणीही अनधिकृत पद्धतीने हाजची यात्रा करु नये, असे आवाहन सौदी अरेबियाने केले आहे. तरीही लक्षावधी मुस्लीम अधिकृत अनुमती न घेता हाज यात्रेसाठी आलेले आहेत. त्यामुळे मक्केच्या स्थानिक प्रशासनावर यात्रेकरूंना सुविधा पुरवण्याचा दबाव वाढला आहे. ईजिप्तप्रमाणे पाकिस्तान, भारत, मलेशिया, जॉर्डन, इंडोनेशिया, इराण, सेनेगल, ट्यूनिशिया, इराक आदी देशांमधून आलेल्या भाविकांपैकी काहीजण असह्या उष्णतेचे बळी ठरले आहेत, अशी माहिती तेथील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.









