मी कालच्या लेखात म्हटलं होतं की लॉईडच्या विंडीज संघाने एकेकाळी फार मोठा दबदबा निर्माण केला होता. परंतु त्यानंतर त्यांना उतरती कळा लागली होती. एकंदरीत काय तर कधी खाली तर कधी वर असणाऱ्या विंडीज संघाने एक नव्हे तर तब्बल दोन वेळा टी-20 विश्वचषकावर नाव कोरले आहे. एवढं सर्व असून सुद्धा हा देश क्रिकेटमध्ये बेभरवशाचा राहिलाय. कदाचित त्याला कारणं अनेक असतील.त्यात आपल्याला पडायचं नाहीये.
या विश्वचषकात यजमानपद मिळाल्यामुळे त्यांचा या स्पर्धेतील मार्ग सुकर झाला. स्पर्धा सुरू होण्याअगोदर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फार फार तर भारताकडे फेवरेट म्हणून बघितलं जात होतं. परंतु एकंदरीत वेस्ट इंडीजच्या कामगिरीकडे बघितलं तर मात्र हा संघ आता खतरनाक वाटू लागलाय. ग्रुपमध्ये त्यांना फक्त न्यूझीलंडचा अडसर होता. अर्थात तो त्यांनी सहज बाजूला केला. विंडीजचा एक काळ असा होता की आक्रमक गोलंदाज, आक्रमक फटकेबाजी यांच्या जोरावर ते भले भले सामने अगदी सहज सर करायचे.
चालू विश्वचषक स्पर्धेत बघता बघता सलग चार विजय मिळवत विंडीजने आपले इरादे अगदी स्पष्ट केलेत. त्यांचे चारही विजय अगदी निर्विवाद होते. अर्थात त्यांच्या चमूकडे जर आपण नजर टाकली, त्यांच्या टीममध्ये एखाद-दुसरा खेळाडू सोडला तर बाकी जे खेळाडू आहेत ते तसे अननुभवीच आहेत. आतापर्यंत वेस्ट इंडीजने जी दोन विश्व विजेतेपदे पटकावली, त्यावेळी वेस्ट इंडीजला खिजगणतीतही मोजले नव्हते. हीच खऱ्या अर्थाने वेस्ट इंडीजची ताकद आहे. ज्या ज्या वेळी तुम्ही त्यांना कमी लेखता, त्या त्यावेळी ते आक्रमक झालेले दिसले आहेत. एकंदरीत वेस्ट इंडीजसाठी सुऊवात तर छान झाली आहे. त्यांचे फलंदाज व गोलंदाज कर्णधाराचे मनसुबे सार्थ ठरवताना दिसतायत. त्यातच ही स्पर्धा त्यांच्या देशात आहे. त्यामुळे देशवासीयांचा पाठिंबा हा त्यांच्या बाजूने निश्चितच असणार.
सुपर एटमध्ये त्यांची लढत आफ्रिका, अमेरिका आणि इंग्लंडशी होणार आहे. अर्थात हे तिन्हीही तुल्यबळ संघ आहेत. त्यामुळे लढत ही निश्चितच रोमहर्षक होणार, यात काही शंका नाही. एकंदरीत दे धक्का देणाऱ्या या वेस्ट इंडीज संघाकडून या तिन्ही संघांना सावध रहावे लागणार आहे, एवढे मात्र निश्चित. वेस्ट इंडीज आपल्याच मायभूमीत विशेष उत्तीर्ण श्रेणीमध्ये पास होऊन उपांत्य फेरीत धडक मारते की आपल्याच प्रेक्षकांना निराश करते, तो येणारा काळच ठरवेल. एकंदरीत काय तर या चारही संघांना सर्व सामने हे जीवन-मरणाचे असणार यात काही शंका नाही. बघायचे नेमकं काय होतंय ते. तूर्तास तरी यजमान वेस्टइंडीज संघाला खूप खूप शुभेच्छा.
दुसरीकडे आज भारताचा पहिला सामना अफगाणिस्तान संघाविऊद्ध आहे. या सामन्यात रोहित सेना स्पिनर्सविऊद्ध काय डावपेच आखते हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे विराट कोहलीची बॅट कितपत तळपते, यावरही भारताची मोठी मदार राहणार आहे. एकंदरीत काय ही स्पर्धा आता खऱ्या अर्थाने शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक सामना प्रत्येक देशासाठी महत्त्वपूर्ण आहे. इथे मात्र चुकीला माफी नाही एवढं मात्र खरं.









