वृत्तसंस्था/ तुर्कु (फिनलँड)
भारताचा पुरुष भालाफेकधारक अॅथलिट नीरज चोप्रा येथे मंगळवारी होणाऱ्या पॅव्हो नुरमी अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी नीरज चोप्राने पुन्हा आपल्या सरावाला प्रारंभ केला आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने भारताला भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले होते.
मंगळवारी येथे होणाऱ्या या स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक क्रीडा प्रकारात 26 वर्षीय नीरज चोप्रा या एकमेव भारतीय अॅथलिटचा समावेश राहिल. या क्रीडा प्रकारात त्याला जर्मनीच्या नवोदीत मॅक्स डेनिंगकडून कडवा प्रतिकार अपेक्षित आहे. फिनलँडचा भालाफेकधारक अॅथलिट ऑलिव्हर हिलेंडरने 2022 साली झालेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राला मागे टाकले होते. पुन्हा यावेळी सुवर्णपदकासाठी हिलेंडर आणि चोप्रा यांच्यात खरी चूरस पहावयास मिळेल. नीरज चोप्राने 2022 साली या स्पर्धेत 89.30 मी. नोंद करीत रौप्यपदक मिळविले होते. ग्रेनेडाचा विश्वचॅम्पियन अँडरसन पिटर्स तसेच त्रिनिदाद टोबॅगोचा वॉलकॉट यांचाही मंगळवारी होणाऱ्या स्पर्धेत सहभाग राहिल.









