वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अफगाणचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रेहमानच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याला सध्या अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने सुरु असलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला मुकावे लागणार आहे. या स्पर्धेत मुजीबने युगांडा विरुद्धच्या पहिल्या सामन्यात आपला सहभाग दर्शविला होता. पण या सामन्यात त्याला या दुखापतीमुळे गोलंदाजी करता आली नव्हती. आता या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी अफगाण क्रिकेट मंडळाने मुजीब उर रेहमानच्या जागी सलामीचा फलंदाज हजरतुल्ला झेझाईला बदली खेळाडू म्हणून निवडले असून आयसीसीने या निवडीला अधिकृत मान्यता दिली आहे.
आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत क गटातून अफगाणने सुपर एट फेरीमधील आपला प्रवेश निश्चित केला आहे. अफगाणने पीएनजी संघाचा शुक्रवारच्या सामन्यात पराभव केला. तर या गटातून न्यूझीलंडचे आव्हान मात्र प्राथमिक फेरीतच समाप्त झाले.









