गुन्हेगारीवर आधारित वेबसीरिज
भूमी पेडणेकरने स्वत:च्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘दम लगाके हईशा’द्वारे अभिनयाची कारकीर्द सुरू करणारी भूमी लवकरच ‘दलदल’ या वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. भूमीची ही पहिलीच सीरिज असणार आहे. या सीरिजचे चित्रिकरण सुरू झाले असल्याची माहिती भूमीने दिली आहे.
या सीरिजचे दिग्दर्शन अमृत राज गुप्ता करत आहेत. प्राइम व्हिडिओवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये भूमी ही रीता नावाची भूमिका साकारत आहे. ही भूमिका मुंबईतील पोलीस उपायुक्त असलेल्या महिलेची आहे.
विश धमीजा यांचे पुस्तक भिंडी बाजार यावर ही सीरिज बेतलेली आहे. यात भूमी ही डीसीपी रीता फरेराच्या व्यक्तिरेखेत स्वत:चा भूतकाळ आणि वर्तमानाला सामोरे जात अनेक हत्यांचे कोडं उकलताना दिसून येणार आहे. भूमी चालू वर्षात भक्षक या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात तिने महिला पत्रकाराची भूमिका साकारली होती. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती.









