वृत्तसंस्था/ सिडनी
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ऑस्ट्रेलियन खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू प्रणॉय सूर मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. या स्पर्धेत प्रणॉयला मानांकनात पाचवे स्थान देण्यात आले आहे.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या यापूर्वी झालेल्या शेवटच्या दोन स्पर्धांमध्ये प्रणॉयला सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही. गेल्या महिन्यात झालेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉयला पहिल्याच फेरीत भारताच्या मिराबा मेसनामकडून पराभव पत्करावा लागला होता. तर सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये जपानच्या निशीमोटोने प्रणॉयचा केवळ 45 मिनिटात पराभव केला होता. मंगळवारपासून येथे सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर 500 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉयचा सलामीचा सामना ब्राझीलच्या येगोर कोलिहोशी होणार आहे. त्याचप्रमाणे भारताच्या समीर वर्माचा पहिल्या फेरीतील सामना इंडोनेशियाच्या वेरडोयोशी तसेच रवीचा सलामीचा सामना सिंगापूरच्या लोह येवशी होणार आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरीत भारतातर्फे सहभागी होणारा मिथून मंजूनाथचा पहिल्या फेरीतील सामना इंडोनेशियाच्या फरहानशी तसेच किरण जॉर्जचा सलामीचा सामना कॅनडाच्या शेंगशी होणार आहे. महिला एकेरीत भारताच्या आकर्षी काश्यपचा पहिल्या फेरीतील सामना युक्रेनच्या बुहरोवाशी तसेच अस्मिता चलियाचा पहिल्या फेरीतील सामना पेरुच्या कॅस्टिलो बरोबर होईल. अनुपमा उपाध्यायची सलामीची लढत मलेशियाच्या चिंग बरोबर होईल. भारताच्या समीया इमाद फरुखीचा पहिल्या फेरीतील सामना जपानच्या यामागुची बरोबर होईल. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या तीन जोड्यांनी आपला सहभाग दर्शविला आहे.









