नगरसेवक रवी साळुंखे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : शहापूर-बसवाण गल्ली येथे दोन शाळा, दोन अंगणवाड्या आहेत. मात्र त्या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना पाणी आणण्यासाठी इतर ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. तेव्हा या शाळा व अंगणवाड्यांमध्ये नळजोडणी करावी, अशी मागणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बसवाण गल्ली येथील शाळा क्र. 13 आणि 16 मध्ये पाणीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतरांच्या घरात जावून पाणी मागून आणावे लागत आहे. याचबरोबर या ठिकाणी दोन अंगणवाड्या आहेत. त्यांनाही पाणी नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने पाण्याची सोय करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. महानगरपालिकेकडे निधी नसल्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन दिल्याचे सांगण्यात आले.









