महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये असून त्यासंदर्भातील भाष्य़ त्यांनी आज सकाळी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केले. आपल्या पक्ष नेतृत्वाची भेट घेऊन सरकारमधील जबाबदारीतून आपल्याला मुक्त करण्याची विनंती करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला आणि भाजपसह महायुतील मोठ्या धक्क्याला सामोरे जाव लागलं. २०१९ च्या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या २३ जागांवरून ९ जागांपर्यंत पीछेहाट झाली. तर, महाविकास आघाडीला एकुण ३० तर महायुतीला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावं लागलं. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सारखे नेर्तृत्व असतानाही भाजपचे अपयश हा चर्चेचा विषय बनला आहे.
निकालानंतर आज लगेच दुसऱ्या दिवशी भाजप कार्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाचा लेखाजोखा मांडला. तसेच या लोकसभेला महाराष्ट्रामध्ये अपेक्षित यश मिळाले नसल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. ते म्हणाले, “ आम्ही कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावंच लागेल. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो. त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो की मी स्वत: यात कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “येत्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आम्ही कामाला लागणार आहोत. यामध्ये त्यासाठी माझ्या वरती राज्याच्य़ा मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे. मी सरकार मध्ये मंत्री असल्याने पक्ष संघटनांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे मी वरिष्ट नेत्यांना भेटून मला या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती करणार आहे.” असेही त्यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानामुळे सरकारमध्ये एकच खळबळ माजली आहे.