नवी दिल्ली : एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत दाखल होणार आहे. तसेच, तेजस्वी यादवही इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. देशातील लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. आता दिल्लीत नवं सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आज दिल्लीत एनडीएची बैठक होत असतानाच विरोधी पक्ष इंडिया आघाडीचीही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत दाखल होणार आहे. तेजस्वी यादव हे देखील इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे दोन्ही नेते एकाच फ्लाईटनं दिल्लीला रवाना होणार आहेत. सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी दिल्लीला रवाना होणाऱ्या विस्तारा फ्लाईटनं दोन्ही नेते दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत एनडीएच्या बैठकीला मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहणार आहेत. तेजस्वी संध्याकाळी इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. टीडीपी आणि जेडीयू आज दिल्लीत भाजपला पाठिंब्याची पत्रं सादर करतील आणि त्यानंतर एनडीए पुढील सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.
बिहारमध्ये एनडीएला 30 जागा
बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांपैकी जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) यांना प्रत्येकी 12 जागा मिळाल्या आहेत, तर एनडीएचा सहयोगी लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांना 5 आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाला एक जागा मिळाली आहे. तर लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला (राजद) 4 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय काँग्रेसला तीन तर डाव्या पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. पूर्णियाची जागा अपक्ष पप्पू यादव यांच्याकडे गेली आहे.