राहुल गांधींचा अंदाजांवर अविश्वास : ‘इंडिया’ला 295 जागा मिळण्याचा पुनरुच्चार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवणाऱ्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने रविवारी लोकसभा उमेदवारांची बैठक घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात बैठकीचे नेतृत्त्व केले. या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पक्षाचे सर्व उमेदवार व्हर्च्युअल माध्यमातून सहभागी झाले होते. 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवसाची तयारी आणि रणनीती यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. याचदरम्यान काँग्रेसने एक्झिट पोलचे अंदाज नाकारले आहेत. शनिवारी संध्याकाळी जारी करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीएचे सरकार जवळपास 350 जागा मिळवून सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी हे अंदाज चुकीचे असून काँग्रेससह इंडिया आघाडी 295 जागा मिळवेल असा पुनरुच्चार केला आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवारी एक्झिट पोलवर पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, हा एक्झिट पोल नसून ‘मोदी मीडिया पोल’ आहे. हा मोदींचा कौल असून तो काल्पनिक आहे. यावर पत्रकारांनी राहुल यांना ‘इंडिया’ आघाडीला किती जागा मिळतील अशी विचारणा केली असता, “तुम्ही सिद्धू मुसेवालाचे 295 गाणे ऐकले आहे का? आम्ही तेवढ्याच जागा जिंकणार आहोत.” असे स्पष्ट केले. काँग्रेस मुख्यालयात नेत्यांची बैठक घेतल्यानंतर राहुल यांनी हे वक्तव्य केले.
मोदी बेदखल होतील : अधीररंजन चौधरी
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील एक्झिट पोलवर राज्य काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार अधीररंजन चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली. काहीही होऊ शकते, मी ज्योतिषी नाही. पण लोकांनी आमच्या पक्षाला भरभरून मतदान केले आहे. जनतेने पंतप्रधान मोदींना हटवण्यासाठी कौल दिला आहे. भारतातील जनतेचा कौल काही औरच सांगतो, यावेळी मोदींची सत्तेतून हकालपट्टी होणार आहे, असे मोठ्या विश्वासाने त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसवर जनतेचा विश्वास नाही : प्रल्हाद जोशी
एक्झिट पोलचा निकाल पाहिल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही प्रतिक्रिया दिली. आम्ही नेहमी म्हणत होतो की आम्ही 400 चा टप्पा पार करू. काँग्रेस पक्षाची अडचण अशी आहे की त्यांचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही, निवडणूक आयोग, पॅग, संसद यावरही त्यांचा विश्वास नाही. त्यांचा विश्वास कोणावर आहे? त्यांचा स्वत:वरही विश्वास नाही, म्हणूनच लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही, असे प्रल्हाद जोशी म्हणाले.