वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हवाई वाहतूक क्षेत्र नियामक ‘डीजीसीए’ने शुक्रवारी एअर इंडियाला दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणांना जास्त विलंब आणि प्रवाशांची योग्य काळजी न घेतल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने 30 मे रोजी दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को फ्लाइट एआय-183 आणि 24 मे रोजी मुंबई ते सॅन फ्रान्सिस्को फ्लाइट एआय-179 या उड्डाणांना अनावश्यक विलंब झाल्याचा हवाला देत उत्तर मागितले आहे.
विमानांना कित्येक तासांचा विलंब झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. आधीच उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटेने हैराण झालेले प्रवासी विमान विलंबामुळे आणखीनच वैतागले आहेत. याप्रकरणी प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर नागरी विमानोड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानांना होणारा विलंब आणि प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेतली आहे. त्यानंतर एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सोयीशी संबंधित मानके लक्षात न ठेवल्याबद्दल एअर इंडियाविऊद्ध अनेक प्रकरणे निदर्शनास आली आहेत. एअर इंडिया प्रवाशांची काळजी घेण्यात वारंवार अपयशी ठरत आहे. तसेच विमान कंपन्यांकडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांच्या तरतुदींचे पालन केले जात नाही. त्यावर कारवाई का करू नये, हे एअर इंडियाला स्पष्ट करावे लागेल असे सांगण्यात आले आहे.









