बंद असलेल्या शाळेला पुन्हा सुरू करण्यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांच्याकडून पाहणी
वार्ताहर /नंदगड
चन्नेवाडी (ता. खानापूर) येथील बऱ्याच वर्षांपासून बंद असलेली शाळा गावकरी व पालक वर्गाच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. बंद असलेल्या शाळेला सुरू करण्यासंदर्भात खानापूर तालुका गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांनी भेट देऊन पाहणी केली. बंद असलेल्या शाळेला सुरू करण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले होते. यासाठी मंगळवार दि. 28 मे रोजी राजश्री कुडची यांनी सीआरपी बागवान, यल्लाप्पा कोलकार, सिडब्लूएसन कम्मार यांच्यासह चन्नेवाडी शाळेला भेट देऊन पाहणी केली. त्या संदर्भात जिल्हा शिक्षणाधिकारी यांना अहवाल पाठवून दिला असून राजश्री कुडची यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता दाखविली असल्याने गावकरी व पालवर्गाने समाधान व्यक्त केले.
ग्रामस्थ पोहोचले जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात
बुधवार दि. 29 मे रोजी पुन्हा गावकरी व पालकांनी बेळगाव येथे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय येथील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन लवकरात लवकर शाळा सुरू करण्यासाठी व शिक्षक नेमणुकीचा आदेश देण्यासंदर्भात विनंती केली. यावेळी प्रकाश पाटील, विठ्ठल पाटील, फोंडुराव पाटील, किरण पाटील, पांडुरंग ऱ्हाटोळकर, कल्लाप्पा पाटील, सुधाकर पाटील, मुरलीधर पाटील, धनंजय पाटील आदांसह अनेक नागरिक उपस्थित होते.









