विरोधी पक्षांची इच्छा या देशात तालिबानी कायदा आणण्याची आहे. विरोधी पक्षांमुळेच लोकशाहीला धोका आहे. ते प्रभू रामचंद्रांना विरोध करतात आणि दलित, अन्य मागासवर्गीय तसेच आदीवांचे अधिकार नाकारतात. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची मानसिकता नकारात्मक आणि विकासविरोधी असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. योगी आदित्यनाथ सोमवारी उत्तर प्रदेशातील घोशी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अरविंद राजभर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाषण करीत होते.
दलित, अन्य मागासवर्गीय आणि आदीवासींचे आरक्षण काढून ते मुस्लीमांना देण्याची विरोधी पक्षांची योजना आहे. मुस्लीमांचे लांगूलचालन करणे, हेच विरोधी पक्षांचे मुख्य ध्येय आहे. तथापि, शोषित वर्गाचे आरक्षण काढून घेण्याचे विरोधी आघाडीचे कारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. मतदारही विरोधी पक्षांना तशी संधी देणार नाहीत. कारण विरोधकांचा पराभव निश्चित आहे. असे जरी असले तरी सर्व मतदारांनी विरोधी पक्षांच्या घातक योजनांपासून सावध असले पाहिजे. तसेच त्यांना योग्य तो धडाही शिकविला पाहिजे. तरच भारताची राज्यघटना आणि लोकशाही यांचे संरक्षण होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सुरक्षा आणि अर्थव्यवस्था उत्तम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांच्या शासन काळात देशाची सुरक्षा व्यवस्था आणि अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. अनेक विकास योजना सरकारने पूर्ण केलेल्या आहेत. तसेच अनेक योजनांचे काम होत आहे. पायाभूत सुविधा, महामार्ग, ग्रामीण मार्ग, घरोघरी पिण्यासाठी नळाचे स्वच्छ पाणी, विनामूल्य गॅस कनेक्शन, शेतकऱ्यांना मानधन, गरीबांना अन्नधान्य आदी योजना सरकारने अत्यंत कार्यक्षमपणे लागू केल्या आहेत. जनतेला हे माहिती आहे. त्यामुळे निवडणुकीत विजय आमचाच होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









