बिहारमध्ये प्रचार सभेत भाषण करत असताना एका संभाव्य अपघातातून काँग्रेस नेते राहुल गांधी थोडक्यात बचावल्याची घटना घडली आहे. सभेच्या व्यासपीठाचा काही भाग अचानक खचल्यामुळे तो कोसळण्याच्या बेतात होता. त्याचवेळी पाटीलपुत्र मतदारसंघातील राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार मिसा भारती या राहुल गांधी यांना त्यांच्या आसनापाशी नेत होत्या. त्यावेळी ही घटना घडली.
व्यासपीठ एका बाजूला कलल्यामुळे राहुल गांधींना स्वत:चा तोल सांभाळण्यासाठी कसरत करावी लागल्याचे दिसून आले. त्याचवेळी मिसा भारती यांनी प्रसंगावधान दाखवून गांधी यांचा हात धरुन ठेवला. त्यामुळे ते पडण्यापासून वाचले आणि त्यांना कोणताही त्रास झाला नाही. नंतर त्वरित व्यासपीठ ठाकठीक करण्यात आले आणि राहुल गांधी यांचे भाषणही निर्विघ्नपणे या सभेत पार पडले. मात्र, हा प्रसंग राजकीय वर्तुळात काही काळपर्यंत चर्चेचा विषय ठरला होता.









