अध्याय पहिला
जन्ममृत्यूचं अखंड चालू असलेलं चक्र थांबवण्यासाठी माणसानं वाट्याला आलेलं कर्म कोणत्याही फळाची अपेक्षा न करता बाप्पांना अर्पण करावं आणि जे काही फळ मिळेल त्याचा प्रसाद म्हणून आनंदानं स्वीकार करावा. जो कर्म करून ते बाप्पांना अर्पण करेल त्याचं नवीन प्रारब्ध तयार होणार नाही व हळूहळू त्याची चित्तशुद्धी होत जाईल. अशा शांत माणसाच्या मनात परमेश्वराचे प्रतिबिंब उमटते आणि विलक्षण अशा मन:शांतीचा अनुभव माणसाला येतो. कर्मे बाप्पांना अर्पण करण्याची इच्छा तसेच सगळ्यांच्याकडे समबुद्धीने पाहणे हे साधण्यासाठी माणसाला बाप्पांच्या पूर्ण स्वरूपाचे ज्ञान झाले पाहिजे. यासाठी पिंड ब्रह्मांडाचे ज्ञान, सृष्टीची उत्पत्ती, जगत जगदीश संबंध, जीवात्मा परमात्मा यांचे स्वरूप, त्यांचा परस्परसंबंध इत्यादि अनेक विषयांचे ज्ञान झाले पाहिजे. यालाच ज्ञान विज्ञान असं म्हणतात. हे झाल्याखेरीज कर्मयोग पक्का होत नाही. कर्मे बाप्पांना अर्पण करायची, फळाची अपेक्षा करायची नाही म्हंटल्यावर माणसाचं कर्म करायची इच्छाच संपून जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन बाप्पा पुढं सांगतायत की, वाट्याला आलेली कर्मे कुणी टाळू नयेत कारण नवीन कर्मे करण्याचा अधिकार फक्त मनुष्ययोनीत प्राप्त होतो. म्हणून कर्मे टाळणे ही चुकीची विचारसरणी आहे. पुढील श्लोकात कर्म टाळून फलप्राप्ती टाळणाऱ्यांना बाप्पा सावध करतायत ते असं,
जहाति यदि कर्माणि तत: सिद्धिं न विन्दति ।
आदौ ज्ञाने नाधिकार: कर्मण्येव स युज्यते ।। 39 ।।
अर्थ- जिवाने कर्म करणे सोडले तर काहीच साध्य होणार नाही. कारण कर्म करण्यातूनच ज्ञानप्राप्तीचा अधिकार मिळतो. म्हणजेच कर्म टाळले तर ज्ञानप्राप्ती होणार नाही.
विवरण- पूर्वकर्मानुसार माणसाचे प्रारब्ध तयार होते व त्यानुसार कर्मे करण्यासाठीच त्याचा जन्म होतो. त्याने जर ती करण्याचे टाळले तर जन्म वाया जाऊन पुढल्या जन्माची आपोआपच जुळणी होते. हा धोका लक्षात घ्यावा. वाट्याला आलेली कर्मे उत्तमप्रकारे करून ती बाप्पाना अर्पण केली तर आपोआप फलत्याग घडतो. पापपुण्य काहीच जोडले जात नसल्याने नवीन प्रारब्ध तयार होत नाही व जीवाची चित्तशुद्धी होत राहते. प्रारब्धाला अनुसरून जे भोग मिळतील त्यात समाधानी राहण्याची वृत्ती वाढीस लागून मन संतुष्ट राहते. असा मनुष्य मन:शांतीचा धनी होतो. एकदा ह्या मन:शांतीची चटक लागली की, माणसाला इतर कोणत्याच गोष्टीची आवश्यकता वाटत नाही. ही अवस्था अखंड टिकू लागली की, वैराग्य प्राप्त होते. म्हणजे अमुक एक हवं किंवा अमुक एक नको असं वाटायचं बंद होतं. होकारार्थी किंवा नकारार्थी दोन्ही प्रकारच्या इच्छा होत नाहीत. वैराग्यावस्था स्थिर झाली की, असा मनुष्य पुढे जाऊन आत्मज्ञानी होतो. म्हणून कर्मच करायचं नाही असं न ठरवता निरपेक्ष कर्म करून कर्मयोग साधावा असं बाप्पा सांगतात.
या कर्मयोगाचं वैशिष्ट्या सांगताना बाप्पा म्हणतात, चित्तशुद्धी साधलेल्या साधकास ब्रह्म सर्वत्र भरून राहिलेले आहे ह्याचा साक्षात्कार होतो.
कर्मणा शुद्धहृदयो भेदबुद्धिमुपैष्यति ।
स च योग: समाख्यातो मृतत्वाय कल्पते ।।40।।
अर्थ- कर्माने शुद्धचित्त झालेला मनुष्य जीव व ब्रह्म यांच्या ठिकाणी अभेदबुद्धि पावतो. ‘कर्मयोग’ म्हणूनच प्रसिद्ध आहे, कर्मयोग हे मोक्षाचे साधन आहे.
विवरण- कर्मयोगाने चित्तशुद्धी होत जाते. त्यामुळे ब्रह्मऐक्यबुद्धी साधली जाते. सर्वत्र ब्रह्मच भरून राहिले आहे याची खात्री होऊन चित्ताचे भरकटणे बंद होते आणि मोक्षाचा मार्ग खुला होतो. मोक्ष म्हणजे आहे ह्या परिस्थितीत कोणताही बदल नको असे वाटणे. कर्मयोगाचे महात्म्य एव्हढे मोठे आणि अतुलनीय आहे.
क्रमश:








