काँग्रेस आणि समाजवादी पक्ष पाकिस्तानचे सहानुभूतीदार असल्याने ते त्या देशाच्या अणुबाँबची भीती भारतीयांना दाखवित आहेत, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते उत्तर प्रदेशातील बस्ती मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या प्रचार सभेत बुधवारी भाषण करीत होते. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्या युतीचीही त्यांनी आपल्या भाषणात खिल्ली उडविली आहे.
2017 मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत याच दोन पक्षांची युती झाली होती. अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी एकत्रित प्रचार केला होता. तथापि, या युतीचा दारुण पराभव होऊन भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष यांना उत्तर प्रदेश विधानसभेच्या 403 मतदारसंघांपैकी 325 मतदारसंघांमध्ये विजय मिळाला होता. आता पुन्हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हीच जोडगोळी प्रचार करत आहे. विरोधक कितीवेळा तोच तोच फ्लॉप चित्रपट पुन्हा पुन्हा प्रदर्शित करणार, असा खोचक टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात लगावला.
पाकिस्तानची दुर्दशा
एकेकाळी दहशतवादाच्या जोरावर भारताला धमकाविणाऱ्या पाकिस्तानची आज दुर्दशा झाली आहे. आज त्या देशात जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्यही लोकांना मिळेनासे झाले आहे. त्या देशाला आज हाती भीकेचा कटोरा घेऊन दारोदार साहाय्यासाठी याचना करावी लागत आहे. तथापि, आपल्या देशातील विरोधक पाकिस्तानची तळी उचलून धरत आपल्याच देशातील जनतेच्या मनात भीती निर्माण करीत आहेत. जनता अशा विरोधकांना भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
खऱ्या सुधारणा गेल्या 10 वर्षांमध्येच
गेल्या 10 वर्षांमध्येच देशात खऱ्या आणि भक्कम सुधारणा झाल्या आहेत. मार्गनिर्मिती, पायाभूत सुविधा विकास, उज्ज्वला योजना, गरीबांना विनामूल्य धान्य, आरोग्य विमा योजना आणि जनधन योजना यांच्यामुळे कोट्यावधी गरीबांना गरीबी रेषेच्या वर येण्याची संधी मिळाली आहे. गरीब जनता आमच्यावर प्रसन्न आहे. या जनता जनार्दनामुळेच आम्ही पुन्हा जिंकणार आहोत. आम्हाला विजयापासून कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.









