वृत्तसंस्था/ लंडन
आजपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड-पाकिस्तान टी 20 मालिकेत जोस बटलर बेंचवरच बसण्याची शक्यता आहे. जोस बटलर कौटुंबिक कारणामुळे पाकिस्तानविरुद्ध काही सामने गमावू शकतो. बटलर त्याच्या पत्नीला होणाऱ्या तिसऱ्या अपत्यामुळे टी 20 मालिकेतील काही सामन्यांना मुकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, बटलर आयपीएलमध्ये राजस्थानचा सदस्य आहे. त्यानं साखळी सामन्यात शानदार कामगिरी केली. प्लेऑफच्या सामन्याआधी तो मायदेशी परतला आहे. राजस्थानकडून खेळताना बटलर शानदार फॉर्ममध्ये होता. त्याच्या या फॉर्मचा इंग्लंड संघाला फायदा होणार होता, परंतु आता त्याच्या अनुपस्थितीचा संघाला मोठा फटका बसू शकतो. आजपासून इंग्लंड व पाकिस्तान यांच्यात चार सामन्यांची टी 20 मालिका होणार आहे. मालिकेतील पहिला सामना 22 मे, दुसरा सामना 25 मे, तिसरा सामना 28 मे तर चौथा सामना 30 मे रोजी खेळवला जाणार आहे. यानंतर इंग्लंडचा संघ अमेरिकेला रवाना होईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.









