वृत्तसंस्था/ काबूल
1 जूनपासून अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने सुरु होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अफगाण क्रिकेट संघाच्या गोलंदाज सल्लागारपदी विंडीजचा माजी वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्होची नियुक्ती अफगाण क्रिकेट मंडळाने केली आहे.
यापूर्वी दोन वेळा आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या विंडीज संघामध्ये ड्वेन ब्राव्होचा समावेश होता. अफगाणचा क्रिकेट संघ सेंट किट्स येथे यापूर्वीच दाखल झाला असून याता या संघासाठी 10 दिवसांच्या कालावधीकरीता सरावाचे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये ड्वेन ब्राव्होचे अफगाणच्या गोलंदाजांना बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे. 40 वर्षीय ड्वेन ब्राव्होने 295 आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजचे प्रतिनिधीत्व करताना फलंदाजीत 6,423 धावा तर गोलंदाजीत 363 गडी बाद केले आहेत. टी-20 या क्रिकेटच्या प्रकारामध्ये ब्राव्होचा 625 बळींचा विक्रम आजही अबाधित आहे. 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षक वर्गामध्ये त्याचा समावेश होता. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अफगाणचा सलामीचा सामना गयाना येथे 3 जून रोजी युगांडाबरोबर होणार आहे.









