डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते, तर नेहरुंनी आरक्षण दिलेच नसते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काँग्रेस आणि देशाचे पहिले पंतप्रधान नेहरु यांनी शोषित, दलित आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाला विरोध केला होता, अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसवर नव्याने हल्ला चढविला आहे.
बिहारमधील पूर्व चंपारण्य भागातील प्रचार सभेत ते भाषण करीत होते. नेहरुंनी त्यांची आरक्षणविरोधी भूमिका त्यांनी त्यावेळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केली आहे. तथापि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीयांना आरक्षण मिळाले आहे. काँग्रेसने नंतर हे आरक्षण आपल्यामुळेच मिळाले असा दावा करत त्याचे श्रेय घेतले. आता काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षावर उलटा आरोप करीत आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला या निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर आम्ही अधिक चांगल्या प्रकारे दलित, अन्य मागासवर्गीय आणि आदीवासींच्या अधिकारांचे संरक्षण करु शकणार आहोत. हे करण्यासाठीच आम्हाला लोकसभेत जास्तीत जास्त जागा हव्या आहेत, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात मांडली.
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा डाव
धर्माच्या आधारावर आरक्षणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठाम विरोध केला होता. घटनेत धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद नाही. तरीही काँग्रेस आणि विरोधी पक्षांची आघाडी व्होट बँकेच्या मोहापोटी धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचे कारस्थान करीत आहे. तसे झाल्यास दलित, आदीवासी आणि अन्य मागासवर्गीय यांच्या अधिकारांवर गदा येणार आहे. त्यामुळे या समाजांमधील लोकांनी मत देताना सावधानता बाळगावी आणि आपली हानी करणाऱ्यांना मतदान करु नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत केले.









