प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मतमोजणीचा सराव
बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी दि. 7 मे रोजी मतदान घेण्यात आले. आता राजकीय पक्षांसह नागरिकांचे लक्ष मतमोजणीकडे लागून राहिले आहे. त्यानुसार निवडणूक विभागाकडूनही मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली जात आहे. सोमवारी निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिके दाखवून प्रशिक्षण देण्यात आले. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघांतील मतयंत्रे बेळगाव येथील आरपीडी महाविद्यालयाच्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार मतमोजणी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार मतमोजणीला आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सोमवारी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील 700 हून अधिक मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सुवर्ण विधानसौध येथे हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मतमोजणी करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक व एक साहाय्यक असणार आहे. त्यांच्यासोबत राजकीय पक्षांचे मतमोजणी एजंट नेमणूक केले जाणार आहेत. मतमोजणी करताना मतयंत्रे हाताळण्याच्या तांत्रिक गोष्टींची माहिती यावेळी करून देण्यात आली. सीलबंद असणारी मतदान यंत्रे राजकीय पक्षांच्या मतमोजणी एजंटांसमोर कशा प्रकारे हाताळावीत याची माहिती या प्रशिक्षणामध्ये देण्यात आली. प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यावेळी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांसह तांत्रिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चिकोडी लोकसभा
दि. 22 रोजी चिकोडी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सुवर्णसौध येथेच हे प्रशिक्षण होणार आहे, असे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.









