अनेकवेळा मागणी करूनही दुर्लक्ष झाल्याने संताप
बेळगाव : सदाशिवनगर स्मशानभूमी येथील अंत्यसंस्कार केल्या जाणाऱ्या ठिकाणी गेल्या सहा महिन्यांपासून शेडवर छप्पर नसल्याने गैरसोय होत आहे. याबाबत ‘तरुण भारत’ने विशेष वृत्तही प्रसिद्ध केले होते. तथापि, अद्याप प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पावसामध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे कठीण होत आहे. त्याचबरोबर तेथे आलेल्या नागरिकांनाही पावसातच उभे रहावे लागत आहे. व्यक्तीचा शेवटचा प्रवास तरी निर्वेध व्हावा, अशी मागणी होत आहे. याशिवाय या स्मशानभूमी परिसरात बराच कचरा, पाण्याची डबकी साचली आहेत. याकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करावी आणि त्वरित येथील गैरसोयींचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.









