वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाम रायफल्स आणि सीमाशुल्क विभागाने रविवार 19 मे रोजी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत 1.86 कोटी रुपयांचा 406 किलो गांजा जप्त केला. सिपाहिजाला जिल्ह्यातील न्यूरामुरा ताईबंदलच्या जंगलात गांजा लपवून ठेवण्यात आला होता. आसाम रायफल्सने सांगितले की, जप्त केलेला गांजा पुढील कायदेशीर कारवाईसाठी आगरतळ्याच्या सीमाशुल्क विभागाकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या कोणालाही अटक करण्यात आली नसली तरी मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच सदर गांजा कोणत्या ठिकाणी पाठविण्यात येणार होता याचा ठावठिकाणाही शोधला जात आहे.









