आसाम रायफल्ससमोर ठेवली शस्त्रे : मणिपूरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ इंफाळ
ईशान्येतील सर्वात जुन्या बंडखोर गटांपैकी एक असलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ पाम्बेईच्या (युएनएलएफ-पी) 34 कार्यकर्त्यांनी आसाम रायफल्ससमोर आत्मसमर्पण केले. हे सर्व 34 बंडखोर म्यानमारमधून मणिपूरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी आसाम रायफल्सने त्यांना रोखल्यानंतर सैनिकांवर हल्ला करण्याऐवजी त्यांनी शस्त्रे खाली ठेवली.
स्वयंचलित शस्त्रांनी सज्ज असलेल्या या बंडखोरांची म्यानमारमधील प्रतिस्पर्ध्यांशी संघर्ष सुरू होता. याचदरम्यान गोळीबारापासून वाचण्यासाठी बंडखोरांनी मणिपूरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. आत्मसमर्पण केल्यानंतर आसाम रायफल्सने शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सर्व बंडखोरांना तेंगनौपाल पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर त्यांना इंफाळला पाठवण्यात आले आहे. सध्या त्यांना इंफाळमध्ये ठेवण्यात आलेल्या ठिकाणाची माहिती देण्यात आलेली नाही.
‘युएनएलएफ-पी’ने 29 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र आणि मणिपूर सरकारसोबत युद्धविराम करारावर स्वाक्षरी केली होती. यूएनएलएफसह ईशान्येतील बहुतेक बंडखोर गटांनी म्यानमारमध्ये आपले तळ कायम ठेवले आहेत. ते भारतातून केडरची भरती करून म्यानमारमध्ये छावण्या उभारून त्यांना प्रशिक्षण देतात. या बंडखोर गटांचे सूत्रधारही अनेकदा म्यानमारमधून कार्यरत असतात. गेल्या काही दिवसांपासून या बंडखोरांना भारताच्या दिशेने पलायन करण्यास भाग पाडले जात आहे. म्यानमारमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाल्यास हे बंडखोर मणिपूरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात.









