वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची महिला तिरंदाजपटू दीपिका कुमारीला आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालयातर्फे दक्षिण कोरियात खास प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे. पुढील महिन्यात तुर्कीतील अँटेलिया येथे ऑलिम्पिकसाठी अंतिम विश्वपात्र फेरीची तिरंदाजी स्पर्धा होणार आहे.
तुर्कीतील अंतिम ऑलिम्पिक विश्व पात्रता फेरी तिरंदाजी स्पर्धेपूर्वी दीपिका कुमारीला खास प्रशिक्षणासाठी तुर्कीमध्ये पाठविले जाणार असून या प्रशिक्षणाचा सर्व खर्च क्रीडा मंत्रालयातर्फे केला जाणार आहे. यापूर्वी दीपिका कुमारीने विदेशातील प्रशिक्षणाचा खर्च मंत्रालयातर्फे देण्याची विनंती केली होती आणि आता क्रीडा मंत्रालयाने या विनंती अधिकृत मान्यता दिली आहे.
टॉप्सच्या कोअर गटामध्ये दीपिका कुमारीचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत दीपिका कुमारीने रौप्यपदक मिळविल्यानंतर तिचा टॉप्स योजनेमध्ये पुन्हा समावेश करण्याचा निर्णय देण्यात आला आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा पद्धतीनुसार भारतीय तिरंदाजपटू आपले तिकीट निश्चित करण्यासाठी जोरदार सराव करीत आहेत. दक्षिण कोरियातील किम आर्चरी स्कूलमध्ये दीपिका कुमारीसाठी 13 दिवसांच्या कालावधीकरीता खास प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाणार आहे. या शिबिरात तिला अव्वल प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे शिबिर संपल्यानंतर दीपिका कुमारी अँटेलियात 14 जून पासून सुरु होणाऱ्या स्पर्धेत दाखल होईल. भारताची ट्रॅप नेमबाज राजेश्वरी कुमारीलाही प्रशिक्षणासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे.









