उत्तर प्रदेशातील हमीरपूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे खासदार पुष्पेंद्रसिंग चंदेल यांच्यासंबंधी मतदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे. तथापि, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांना निवडून देणे आमचे कर्तव्य आहे, अशी भावना बहुसंख्य मतदार व्यक्त करीत आहेत, असे वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीचे म्हणणे आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुका चंदेल यांनी जिंकल्या होत्या. यंदा ते हॅटट्रिकसाठी प्रयत्नशील आहेत. हमीरपूरमध्ये वातावरण कसे आहे, याची चाचपणी करण्यासाठी वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने तेथे जाऊन अनेक लोकांशी प्रत्यक्ष संपर्क केला. चंदेल यांनी अत्यल्प प्रमाणात मतदारसंघाला भेट दिली आहे, असे मतदारांचे म्हणणे आहे. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आम्ही चंदेल यांनाच निवडून देणार असे, अनेक मतदारांनी स्पष्टपणे प्रतिपादन केले, असे वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने अनेक मतदारांशी बोलल्यानंतर स्पष्ट केले.
प्रामुख्याने ग्रामीण मतदारसंघ
हमीरपूर हा प्रामुख्याने ग्रामीण मतदारसंघ आहे. वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने मवाई आणि हमीरपूर या भागांमधील अनेक गावांना भेट दिली. अनेक मतदारांनी विद्यामान खासदाराच्या कामगिरीसंबंधी राग व्यक्त केला. तथापि, हा प्रश्न खासदाराचा नाही. तर तो देशाचा आहे. त्यामुळे आम्ही चंदेल यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मत देणार, असे बहुसंख्याकांनी स्पष्ट केले.









