वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदतठेवींवरील (एफडी) व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. एसबीआयने 46 दिवसांपासून 179 दिवसांपर्यंतच्या एफडीचे व्याजदर 4.75 टक्क्यांवरून वाढवत 5.50 टक्के केले आहेत. तर 180 दिवस ते 210 दिवसांपर्यंतच्या एफडीवर आता 5.75 टक्क्यांऐवजी 6 टक्के व्याज प्राप्त होणार आहे. वाढीव व्याजदरामुळे बँकेच्या खातेधारकांना काही प्रमाणात लाभ होणार आहे.
अशाचपकारे 211 दिवस ते 1 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर आता 6 टक्क्यांऐवजी 6.25 टक्के व्याज मिळणार आहे. उर्वरित कालावधीच्या एफडींच्या व्याजदरात कुठलाच बदल करण्यात आलेला नाही. हे व्याजदर 15 मेपासून लागू झाले आहेत. व्याजाचे हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीचे आहेत.









