लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन
बेळगाव : 2023-24 सालातील दुष्काळामुळे झालेल्या पीकहानीची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात आली आहे. फ्रुट्स तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्ह्यातील 3 लाख 74 हजार 66 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 316.52 कोटी रुपयांची भरपाई जमा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सोमवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी, बँक खात्याला आधार जोडणी न करणे, फ्रुट्स आयडीमधील नावांची तफावत आदी कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांची भरपाई जमा झाली नाही. त्यांनी आपल्या तालुक्यातील तहसीलदार कार्यालय किंवा साहाय्यक कृषी संचालकांच्या कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या हेल्प डेस्कशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बँक खात्यांना आधार जोडणी न झाल्यामुळे 32,986, आधार व फ्रुट्स आयडीमधील नावांच्या तफावतीमुळे 7,594 व इतर कारणांमुळे 1,576 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा झाली नाही. अशा शेतकऱ्यांनी त्वरित हेल्प डेस्कशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.









