मराठी माध्यमाचा 83.44 टक्के : उडुपी जिल्हा 94 टक्के निकालासह अव्वल
बेंगळूर : यंदाच्या दहावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल 73.40 टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी निकालात 10.4 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मागील वर्षी दहावीचा एकूण निकाल 83.89 टक्के लागला होता. मराठी माध्यमाचा निकाल 83.44 टक्के लागला आहे. बागलकोटमधील अंकिता बसप्पा कोन्नूर या विद्यार्थिनीने 625 पैकी 625 गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या अध्यक्षा पूर्णिमा आणि परीक्षा विभागाचे संचालक गोपालकृष्ण यांनी बेंगळूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. उडुपी शैक्षणिक जिल्हा दहावी निकालात अग्रेसर राहिला आहे. उडुपीचा निकाल 94 टक्के लागला आहे. द्वितीय स्थानी मंगळूर जिल्हा (92.12) तर तिसऱ्या स्थानी शिमोगा जिल्हा (88.67) आहे. तर 50.59 टक्के निकालासह यादगिरी शैक्षणिक जिल्हा शेवटच्या स्थानी म्हणजे 35 व्या स्थानावर आहे.
दहावी निकालात मुलीच वरचढ ठरल्या आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 81.11 टक्के तर मुलांचे उत्तीर्ण प्रमाण 65.90 टक्के आहे. परीक्षा निकालात यावेळी देखील ग्रामीण विद्यार्थ्यांनी शहरी विद्यार्थ्यांवर मात केली आहे. ग्रामीण भागातील 74.17 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर शहरी भागातील विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 72.83 टक्के इतके आहे. यंदा 8,59,967 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 6,31,204 जण उत्तीर्ण झाले. यावेळी गतवर्षीपेक्षा 10 टक्के अधिक ग्रेसमार्क देण्यात आले आहेत. तरी सुद्धा निकालात मोठी घसरण झाली आहे. यंदा प्रथमच वेबकास्टिंग पद्धतीचा अवलंब करून परीक्षेत पारदर्शकपणा आणि कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी एका वेळेसाठी 2024 च्या सर्व तीन परीक्षांसाठी सर्व विषयांमध्ये ग्रेसमार्क देण्याकरिता पात्र गुण 35 वरून 25 इतके घटविण्यात आले आहे. एकूण 34 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. यामध्ये 11 अनुदानित आणि 23 विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे.
एक विद्यार्थिनी प्रथम तर 7 विद्यार्थी द्वितीय
बागलकोटमधील विद्यार्थिनी अंकिता कोन्नूर या विद्यार्थिनीने 625 पैकी 625 गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर सात विद्यार्थ्यांना 624 गुण मिळाले आहेत. त्यांचा राज्यात तृतीय क्रमांक आला आहे. 14 विद्यार्थ्यांनी 623 गुण मिळवत चतुर्थ तर 44 विद्यार्थ्यांनी 621 गुण मिळवत राज्यात पाचवा येण्याचा मान मिळविला आहे.
कन्नडपेक्षा इंग्रजी माध्यमाचे उत्तीर्ण विद्यार्थी अधिक
यावेळी दहावी परीक्षेत कन्नड माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 69.34 टक्के तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण प्रमाण 88.29 टक्के आहे.
पैकीच्या पैकी गुण
प्रथम भाषा कन्नडमध्ये 7,664 विद्यार्थ्यांना 125 पैकी 125 गुण मिळाले आहेत. तर द्वितीय भाषा विषयात 5,583 विद्यार्थी, तृतीय भाषेत 10,890 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. गणित विषयात 784 विद्यार्थ्यांना, विज्ञान विषयात 277 आणि समाज विषयात 2,060 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत.
स्कॅन प्रत मिळविण्यासाठी 16 मेपर्यंत नोंदणी
उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत मिळविण्यासाठी 16 मे पर्यंत नोंदणी करता येईल. तर फेरगुणमोजणी आणि फेरमूल्यमापनासाठी अर्ज करण्याची 22 मे अंतिम मुदत आहे. फेरगुणमोजणीसाठी केवळ ऑनलाईनद्वारे अर्ज सादर करता येणार आहे.
जिल्हानिहाय निकाल
उडुपी 94 टक्के,मंगळूर 92.12 टक्के,शिमोगा 88.67 टक्के,कोडगू 88.67 टक्के,कारवार 86.54 टक्के,हासन 86.28 टक्के,म्हैसूर 85.5 टक्के,शिरसी 84.64 टक्के,बेंगळूर ग्रामीण 83.67 टक्के,चिक्कमंगळूर 83.39 टक्के,विजापूर 79.82 टक्के,बेंगळूर दक्षिण 79 टक्के,बागलकोट 77.92 टक्के,बेंगळूर उत्तर 77.09 टक्के,हावेरी 75.85 टक्के,तुमकूर 75.16 टक्के,गदग 74.76 टक्के,चिक्कबळ्ळापूर 73.61 टक्के,मंड्या 73.59 टक्के,कोलार 73.57 टक्के,चित्रदुर्ग 72.85 टक्के,धारवाड 72.67 टक्के,दावणगेरे 72.49 टक्के,चामराजनगर 71.59 टक्के,चिकोडी 69.82 टक्के,रामनगर 69.53 टक्के,विजयनगर 65.61 टक्के,बळ्ळारी 64.99 टक्के,बेळगाव 64.93 टक्के,मधुगिरी 62.44 टक्के,रायचूर 61.2 टक्के,कोप्पळ 61.16 टक्के,बिदर 57.52 टक्के,कलबुर्गी 53.04 टक्के,यादगिरी 50.59 टक्के