हिरोमोटो कॉर्प, एशियन पेन्ट्स यांचे समभाग प्रभावीत
मुंबई :
चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्स हा काहीशा घसरणीसह बंद झाला आहे. यामध्ये दिवसभरातील चढउतराच्या प्रवासानंतर अंतिम क्षणी बाजार हलक्या घसरणीसह बंद झाला आहे. यावेळी जागतिक पातळीवर आशियासह अन्य बाजारांमध्ये नकारात्मक स्थिती पहावयास मिळाली होती.
दरम्यान बाजारात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतली आहे. यासोबतच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध झाल्याचे दिसून आले. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बुधवारी सेन्सेक्स 611 अंकांनी वधारला होता. मात्र अंतिम क्षणी तो 45.46 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 73,466.39 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सपाट स्तरावर बंद झाला होता. निफ्टी हा अंतिम क्षणी 22,302.50 वर बंद झाला आहे. निफ्टी 22,185.20 आणि 22,368.65 च्या दरम्यान ट्रेंडिंगमध्ये कार्यरत राहिला.
बाजारातील व्यापक स्थितीनंतर बीएसई मिडकॅप आणि स्मॉकॅप यांच्या निर्देशांकाने चांगली कामगिरी केली. घसरणीत राहिलेल्या कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील एशियन पेन्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग प्रामुख्याने नुकसानीत राहिले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये टाटा मोर्ट्स, पॉवरग्रिड, एनटीपीसी, लार्सन अॅण्ड टुब्रो तसेच मारुती सुझुकी यांचे समभाग नफा कमाईसह बंद झाले आहेत.
जागतिक बाजारांमध्ये आशियातील व अन्य बाजारांमध्ये जपानचा निक्की, चीन शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे नुकसानीत राहिले आहेत. तर दक्षिण कोरियाचा कॉस्पी तेजीत राहिला आहे. युरोपमधील बाजार हे तेजीत होते. अमेरिकन बाजार वॉल स्ट्रीटमध्ये मंगळवारी मिळताजुळता कल राहिल्याची नोंद आहे.
शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थाच्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी 3,668.84 कोटी रुपये किमतींच्या समभागांची विक्री केली आहे. तर जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूड 1.65 टक्क्यांनी घसरुन 81.79 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.









