वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसीतर्फे पुरुष आणि महिलांच्या क्रिकेट विभागामध्ये प्रत्येक महिनाअखेर क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेत मासिक सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला जातो. आता एप्रिल महिन्यासाठी महिलांच्या विभागात लंकेची चमारी अटापटू, विंडीजची हिली मॅथ्यू आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वुलवर्ट यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. तर पुरुषांच्या विभागात पाकचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी, नामिबीयाचा गेरार्द इरासमुस आणि संयुक्त अरब अमिरातचा मोहम्मद वासिम यांच्यात चुरस राहिल.
लंकेची महिला क्रिकेटपटू चमारी अटापटूने 2023 च्या क्रिकेट हंगामातील आयसीसीची वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरली होती. या कामगिरीमुळे चमारीने 50 षटकांच्या वनडे क्रिकेट प्रकारात आपल्या कामगिरीत सातत्य राखले. तसेच तिने आयसीसीच्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत पुन्हा अग्रस्थान मिळविले आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध चमारीने एका सामन्यात नाबाद 195 धावांची खेळी केली होती. तसेच सध्या अबुधाबीत सुरु असलेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक पात्र फेरीच्या स्पर्धेतील सामन्यात तिने स्कॉटलंड विरुद्ध अर्धशतक झळकवले. विंडीजच्या हिली मॅथ्यूजने मार्च महिन्यातील आयसीसीचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळविला आहे. दरम्यान गेल्या महिन्यात पाकिस्थानच्या दौऱ्यावर विंडीज संघातील हिलीने फलंदाजीत 451 धावा जमविल्या असून तिने टी-20 आणि वनडे या दोन्ही प्रकारात गोलंदाजी करताना 12 गडी बाद केले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वुलवर्टने गेल्या महिन्यात लंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकविले होते. तसेच तिने वनडे क्रिकेटमध्ये तीन सामन्यातून 184 धावा जमविल्या होत्या. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तिने नाबाद 110 धावांची खेळी केली होती.
पुरुषांच्या विभागात आयसीसीच्या एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी शिफारस करण्यात आलेल्या पाकच्या वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने न्यूझीलंड विरुद्धची टी-20 मालिका बरोबरीत सोडविली होती. या मालिकेत त्याने दर्जेदार गोलंदाजी करताना 8 गडी बाद केले होते. या मालिकेत आफ्रिदीची मालिकावीर म्हणून निवडही झाली होती. ओमान विरुद्धच्या मालिकेत नामिबीयच्या इरासमुसने अष्टपैलू कामगिरी केली. फलंदाजीत त्याने 145 धावा तर गोलंदाजीत 8 गडी बाद केले. संयुक्त अरब अमिरात संघाचा कर्णधार आणि सलामीचा फलंदाज मोहम्मद वासिमने एसीसी प्रिमियर चषक क्रिकेट स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करत आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. त्याने या स्पर्धेत 269 धावा जमविल्या असून त्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. आयसीसीच्या पुरस्कारासाठी पहिल्यांदाच ओमानच्या वासिमची शिफारस करण्यात आली आहे.









