काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
पणजी : सरकारी सार्वजनिक तिजोरीचा भाजप सरकारने गैरवापर केल्याची तक्रार गोवा प्रदेश काँग्रेस समितीने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. माहिती व प्रसिद्धी खात्याने भाजप उमेदवाराची पुस्तिका प्रकाशित केली असून ती प्रचारासाठी वापरली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सत्तेचा गैरवापर आणि जनतेच्या तिजोरीचा हा अपव्यय असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. करदात्यांचे सरकारी तिजोरीतील पैसे पुस्तिका छापण्यासाठी वापरले असून हा गंभीर प्रकाराचा गुन्हा आहे. आचारसंहितेचा हा भंग असून त्या पुस्तिकेचा खर्चही भाजपने दाखवलेला नाही. आर्श्चय म्हणजे निवडणूक आयोगाचे अधिकारी सर्वत्र फिरतात आणि त्यांनी हा प्रकार कसा काय नोंद केला नाही? का त्याकडे दुर्लक्ष केले? असेही तक्रारीतून विचारण्यात आले आहे. खोर्ली म्हापसा येथे 30 एप्रिल रोजी झालेल्या प्रचारावेळी त्या पुस्तिका वाटण्यात आल्या आणि इतर ठिकाणी देखील त्यांचे वाटप चालू असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल कवठणकर यांनी सदर तक्रार नोंदवली आहे.








