चारा संकट गंभीर : जिल्ह्यात केवळ सहाच चारा छावण्या सुरू : पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ
बेळगाव : दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्याला निवडणुकीचा ब्रेक लागला आहे. त्यामुळे पशुपालकांची चाऱ्यासाठी सकाळपासूनच धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यात पाण्याअभावी सर्वत्र चारा संकट गंभीर बनले आहे. त्यातच निवडणुकीच्या रणधुमाळीला रंग आला आहे. त्यामुळे चारा नियोजनाकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. आवश्यक त्या ठिकाणी चारा बँक सुरू झाल्या नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होऊ लागले आहेत. जिल्ह्यात 13 लाखांहून अधिक मोठ्या जनावरांची संख्या आहे. यामध्ये गाय, म्हैस, बैल आणि शेळ्या, मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात चाऱ्याची गरज भासते. मात्र पावसाअभावी अथणी, रायबाग, चिकोडी, रामदुर्ग, सौंदत्ती, निपाणी, बैलहोंगल तालुक्यात चारा संकट अधिक तीव्र बनले आहे. दरम्यान पशुपालकांनी संबंधित तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे चाऱ्यासाठी वेळोवेळी निवेदने सादर केली आहेत. अधिकाऱ्यांनी चारा छावण्या सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे जनावरांचे पाणी आणि चाऱ्याविना हाल होताना दिसत आहेत. बेळगाव जिल्ह्यात किमान 50 ते 60 चारा छावण्या सुरू करणे गरजेचे आहे. मात्र अथणी तालुक्यात 3, रामदुर्ग, रायबाग आणि चिकोडी तालुक्यात प्रत्येकी एक अशा एकूण सहा चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात जनावरांची संख्या पाहता या चारा छावण्या तुटपुंज्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या ठिकाणी चाऱ्याची कमतरता भासते त्या ठिकाणी चारा छावणी सुरू केल्या जातील, असे सांगण्यात आले होते. शिवाय पुढील 16 आठवडे पुरेल इतका चारासाठा शिल्लक असल्याचा दावा पशुसंगोपनने केला आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये चाऱ्याअभावी परिस्थिती गंभीर बनू लागली आहे. चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांना झाडाचा पाला घालून गुजराण करावी लागत आहे. केवळ सहा ठिकाणीच चारा बँका सुरू करण्यात आल्याने येणारा चारा शेतकऱ्यांना पुरेनासा झाला आहे. त्यामुळे चाऱ्यासाठी पशुपालकांना सकाळपासूनच रांगेत थांबावे लागत आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पशुपालकांना चाऱ्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
चाऱ्याच्या किमतीत वाढ
गत पावसाळ्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पिकांची हानी झाली होती. परिणामी जिल्ह्यात ओल्या आणि सुक्या चाऱ्याची कमतरता जाणवू लागली आहे. त्यातच एका चारा ट्रॉलीची किंमत 15 ते 20 हजार रुपये झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एवढे पैसे देऊन खरेदी करणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांवर चाऱ्याअभावी जनावरे विकण्याची वेळ आली आहे. चारा छावण्यांमध्ये पशुपालकांना सहा रुपये किलोप्रमाणे चारा दिला जात आहे. मात्र चारा छावण्यांची संख्या कमी असल्याने तो पुरेनासा झाला आहे. परिणामी जनावरांच्या आरोग्यावर आणि दूध क्षमतेवरही परिणाम होऊ लागला आहे. काही भागात अद्याप वळिवाचा पाऊस झाला नाही. त्यामुळे नवीन चाऱ्याची उगवणदेखील झाली नाही. परिणामी चारा संकट अधिक तीव्र बनू लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, मंत्री, आमदार प्रचारात दंग झाले आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यात चारा टंचाईने डोकेवर काढले आहे. चाऱ्याविना मुक्या जनावरांचे हाल होऊ लागले आहेत.
जनावरांना पुरेशा चाऱ्याची व्यवस्था केली जाणार
जिल्ह्यातील चिकोडी, अथणी, हुक्केरी, निपाणी भागात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. रायबाग, रामदुर्ग, सौंदत्ती तालुक्यातही चाऱ्याची समस्या आहे. त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू केल्या जाणाऱ्या आहेत. जनावरांना पुरेशा चाऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे.
– राजीव कुलेर, सहसंचालक पशुसंगोपन









