माळमारुती पोलिसांची कारवाई
बेळगाव : वाईन शॉपसमोर तलवार फिरवून भीती निर्माण करणाऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून माळमारुती पोलिसांकडून फरार झालेल्या तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. महम्मद गुफ्रान मण्णूरकर (वय 24, रा. उज्ज्वलनगर), अप्सर उर्फ अच्चु मुन्ना धारवाडकर (वय 25, रा. न्यू गांधीनगर), सलीम खलील हुब्बळ्ळी (वय 26, रा. आझादनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. संभाजी गल्ली-महाद्वार रोड येथील महेश साळवे यांनी याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून महम्मदरफीक मुन्ना धारवाडकर (रा. उज्ज्वलनगर) याला माळमारुती पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक करून त्याच्याकडील बेकायदेशीरपणे वापरली जाणारी तलवार जप्त करून न्यायालयासमोर हजर केले होते. भा.दं.वि. आयुध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. माळमारुती पोलिसांकडून फरार झालेल्या संशयितांचा शोध जारी ठेवण्यात आला होता. त्यानुसार फरार झालेल्या उपरोक्त संशयितांना माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.









