विदेश मंत्रालयाचे स्पष्टीकरण : शक्सगाम खोऱ्यातील चीनच्या निर्मितीकार्याला विरोध
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
कर्नाटकातील निजदचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. नव्या घडामोडीत विदेश मंत्रालयाने प्रज्ज्वल यांना जर्मनीत जाण्यासाठी अनुमती देण्यात आली नव्हती असे स्पष्ट केले आहे. प्रज्ज्वल यांनी सरकारकडून जर्मनी प्रवासासाठी मंजुरी मागितली नव्हती असे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले आहे. राजनयिक पासपोर्टधारकांसाठी जर्मनीचा प्रवास करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा व्हिसा आवश्यक नसतो. विदेश मंत्रालयाने खासदारासाठी कुठल्याही अन्य देशासाठी व्हिसा नोट देखील जारी केलेले नाही. प्रज्ज्वल रेवण्णा यांनी राजनयिक पासपोर्टवर प्रवास केला होता असे विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
चीनला भारताचा विरोध
सियाचीन नजीकच्या शक्सगाम खोऱ्यातील निर्मितीकार्याप्रकरणी विदेश मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्यक्ष स्थितीत एकतर्फी बदलाच्या ‘अवैध’ प्रयत्नाच्या विरोधात भारताने स्वत:ची बाजू ठामपणे मांडली आहे. निर्मितीकार्याच्या वृत्तांची गंभीर दखल घेत सरकारने चीनसमोर स्वत:चा आक्षेप नोंदविला आहे. शक्सगाम खोरे ऐतिहासिक स्वरुपात भारताचा हिस्सा असल्याचे जायसवाल यांनी नमूद पेले आहे. 1963 च्या कथित चीन-पाकिस्तान सीमा कराराला भारताने कधीच मान्यता दिलेली नाही. या कराराच्या माध्यमातून पाकिस्तानने अवैध स्वरुपात हे क्षेत्र चीनला सोपविण्याचा कट रचला होता.
पाऊल उचलण्याचा अधिकार
भारताने सातत्याने स्वत:चा आक्षेप व्यक्त केला आहे. आम्ही प्रत्यक्षस्थितीत बदलाच्या अवैध प्रयत्नांच्या विरोधात चीनसमोर विरोध नोंद केला आहे. आम्ही आमच्या हितांच्या रक्षणासाठी आवश्यक पावले उचलण्याचा अधिकार सुरक्षित ठेवतो असे त्यांनी म्हटले आहे. शक्सगाम खोरे सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. सध्या हा भौगोलिक भाग पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा हिस्सा आहे.
अमेरिकन संस्थेचा अहवाल पक्षपाती
अलिकडेच प्रकाशित युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडमच्या अहवालावर विदेश मंत्रालयाने भूमिका मांडली आहे. ही संस्था यापूर्वीही स्वत:चा अहवाल जारी करत आली आहे. या संस्थेला पक्षपाती म्हणून ओळखले जाते. या संस्थेचा स्वत:चा राजकीय अजेंडा आहे. ही संस्था वार्षिक अहवालाच्या हिस्स्याच्या स्वरुपात भारतासंबंधी दुष्प्रचार करत आहे. अमेरिकेच्या संस्थेला आमच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नांमध्ये कधीच यश मिळणार नाही असे जायसवाल यांनी सुनावले आहे.









