‘या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होत आहे, याचे पाकिस्तानला मनस्वी दु:ख होत आहे. कारण काँग्रेस पक्ष हा पाकिस्तानचा ‘शिष्य“ आहे. या पक्षाने अयोध्येतील भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रणही नाकारले होते. या घटनांवरुन या पक्षाची मनोवृत्ती कोणत्या प्रकारची आहे हे स्पष्ट होत आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते गुजरातच्या सुरेंद्रनगर लोकसभा मतदारसंघात गुरुवारी एका प्रचारसभेत भाषण करीत होते. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या काळात केलेल्या कामांची माहिती दिली. गरीबांसाठी आपल्या सरकारने अनेक उपक्रम आणि योजना लागू केल्या आहेत. त्यांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचविला जात आहे. काँग्रेसच्या काळात 10 वर्षांपूर्वी केवळ भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांची चर्चा ऐकू येत असे. आज मात्र, देश विकासाच्या मार्गावर अग्रेसर असून आमच्याकडे पुढील दोन दशकांच्या विकासाचे प्रारुप सज्ज आहे. आमची कामे लोकांना माहीत असल्याने या लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
प्रगतीपत्र प्रसिद्ध करण्याची प्रथा
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात प्रत्येक वर्षी केलेल्या कामगिरीसंबंधी प्रगतीपत्र प्रसिद्ध केले जाते. सरकार आपल्यासाठी काय करीत आहे, याची जाणीव जनतेला वेळोवेळी करुन देणे आवश्यक असते. त्यामुळे अशी प्रथा गुजरातमध्ये पाडण्यात आली आहे. अशाप्रकारे जनतेला विश्वासात घेतल्यानेच भारतीय जनता पक्षाची प्रगती लोकसभेत बहुमत मिळविण्यापर्यंत झाली. या लोकसभा निवडणुकीतही ही प्रगती अशीच होणार आहे. विरोधी पक्षांना याची पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे ते वेगवेगळी निमित्ते आत्तापासूनच शोधून ठेवण्याच्या कामाला लागले आहेत, असा टोलाही त्यांनी भाषणात लगावला.
निर्णयाचे समर्थन
इलेक्ट्रॉनिक मतगणना यंत्रात कोणताही दोष नाही असा निर्वाळा नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच विनाकारण व्यवस्थेसंबंधी संभ्रम निर्माण करणे योग्य नाही, असे ताशेरेही ओढले आहेत. या निर्णयामुळे विरोधकांची कोंडी झाली असून त्यांच्या हातून पराभवाच्या करणाचे एक निमित्त निसटले आहे. त्यामुळे त्यांनी आता इतर निमित्ते शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे. हे त्यांचे प्रयत्न मतगणना झाल्यानंतर उपयोगी पडतील, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
भाजपचा विजय निश्चित !
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे पार पडले आहेत. दोन्ही टप्प्यांमध्ये आमच्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाची आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सरशी झालेली आहे. पुढच्या सर्व टप्प्यांमध्येही आम्हालाच जनतेची भरभरुन मते मिळतील आणि आमचा मोठा विजय होईल. विरोधकांना या निवडणुकीत कोणतीही संधी नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विरोधकांचा आता ‘व्होट जिहाद“
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आढळते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्याचा संदर्भ देत त्यांनी पुन्हा काँग्रेसवर टिप्पणी केली. विरोधी पक्षाच्या एका नेत्याने आता ‘व्होट जिहाद“चे आव्हान केले आहे. त्यांच्या वृत्तीतून अद्यापही ‘जिहाद“ ही संकल्पना गेलेली नाही. त्यांच्यावरील आरोप त्यांनीच खरा केला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.









