वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्ष निवडणूक प्रचारासाठी पूर्ण ताकद लावत आहेत. याचदरम्यान निवडणूक आयोगाने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस प्रमुख के चंद्रशेखर राव यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई केली आहे. त्यांच्यावर 1 मे रोजी रात्री 8 वाजल्यापासून 48 तास प्रचार करण्यास बंदी घातली आहे. त्यांनी सिरिल्ला येथे काँग्रेसच्या विरोधात ‘अपमानास्पद आणि आक्षेपार्ह विधाने’ केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार केसीआर यांना 3 मे रोजी रात्री 8 वाजेपर्यंत प्रचार करण्याची परवानगी मिळणार नाही.
निवडणूक आयोगाने बुधवारी भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना काँग्रेसच्या विरोधात ‘आक्षेपार्ह’ टिप्पणी केल्याबद्दल 48 तासांसाठी प्रचार करण्यास मनाई केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर 48 तासांची बंदी घालण्यात आलेले केसीआर राव हे काँग्रेस नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांच्यानंतरचे दुसरे राजकारणी ठरले. अनेक राज्यांतील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात संपूर्ण देशाच्या आदर्श आचारसंहितेअंतर्गत निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.