मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शौमिका महाडीक यांचा सवाल
कागल : प्रतिनिधी
सातारचे छत्रपती उदयनराजे हे छत्रपती असल्याचा पुरावा शिवसेनेचे (उबाठा ) खासदार संजय राऊत मागतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आपले छत्रपती निवडणुक लढवतात ,यासारखे कोल्हापूरचे दुर्दैव ते कोणते ? हा गादीचा अपमान झाला नाही का? त्यावेळी कोल्हापूरच्या अस्मितेला ठेच पोहोचली नाही का? असा सवाल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी केला.
कागलमध्ये श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. सभेला मोठी गर्दी झाली होती.
शौमिका महाडीक म्हणाल्या, काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा महाराजांनी अभ्यास केला आहे का? त्यास 100 टक्के समर्थन आहे का ? राजर्षिंचा इतिहास सांगण्यापेक्षा स्वत? काय कर्तृत्व केले ते लोकांपुढे ठेवा. संभाजीराजेंना भाजपने राज्यसभेचे खासदार केले. त्यांनी सहा वर्षात कोणती विकासकामे केली हे विचारण्याचा तुमचा-आमचा अधिकार आहे. दुस्रयांदा राज्यसभेवर जाण्यासाठी ते मातोश्रीची पायरी चढले. ठाकरेंनी शिवबंधनाशिवाय उमेदवारी देणार नसल्याचे ठामपणे सांगितल्यावर त्यांनी स्वराज्य संघटना काढली. किमान महाराजांनी या संघटनेची उमेदवारी केली असती तरी आम्ही मान्य केलं असतं.पण ज्यानी तिकीट नाकारलं त्यांचाच मान- सन्मान करत बसण्याची वेळ आली. भाजपने सन्मानाने खासदारीकी दिल्यावर हे ,पेशव्यांची चाकरी करणार काय? पेशवे छत्रपतींची नेमणूक करणार काय? असेही खा. राऊत म्हणाले होते. आता हा गादीचा अपमान झाला नाही का?
राजघराणे ही मोठी जबाबदारी आहे. राजर्षी शाहूंचे जनतेवर मोठे ऋण आहे. शाहूंच्या चांगुलपणाचा लाभ उठवणारे राक्षसी महत्वाकांक्षेने पछाडले आहेत. त्यांच्यापासून जनतेने सावध राहावे. असा इशाराही सौ. महाडिक यांनी दिला.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महाराज, मैदान म्हटल्यावर नाका -तोंडात माती जाणारच ! पण तुम्ही एका पक्षाचा हिस्सा झालात. हे योग्य नाही. स्वत? निवडणूक न लढविणाऱ्यांच्या गळाला लागलात. महाराजांना सन्मानच द्यायचा होता तर राज्यसभा निवडणुकीत खासदार करून झाला असता. संभाजीराजे यांना भारतीय जनता पार्टीने खासदार केले हे आपण कसे विसरलात अशी टीका करून दूधगंगा- वेदगंगा नदीकाठ समृद्ध करणाऱ्या स्व.मंडलिकांचे पांग फेडा. असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, ठसंसदेत 106 घटनादुरुस्त्यांपैकी काँग्रेसने 73 तर मोदी सरकारने केवळ 6 घटनादुरुस्त्या केल्या. त्यामुळे संविधानाला धोका काँग्रेस पासूनच आहे. निवडून आलेल्या खासदारालाच लोकसभेमध्ये बोलावे लागते. प्रवक्त्याला नव्हे ! अशी कोपरखळी त्यांनी लगावली.