मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा गोकाक मतदारसंघात प्रचार
बेळगाव : लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाची भीती असल्याने राज्यातील भाजप नेत्यांकडून राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजनांबद्दल अपप्रचार केला जात आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करून भाजपला मतदार योग्य धडा शिकवतील, असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. गोकाक विधानसभा मतदारसंघातील शिंदीकुरबेट, धुपदाळ आणि पामलदिन्नी गावांना भेटी देऊन काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा प्रचार करून त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, गॅरंटी योजना निवडणुकीनंतर थांबविल्या जाणार नाहीत. ही मोदींची गॅरंटी नाही तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची गॅरंटी आहे. या योजना कदापिही बंद केल्या जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. गॅरंटी योजना गोरगरिबांच्या कल्याणासाठी आहेत. प्रत्येक नागरिकाला या योजनांचा लाभ करून दिला जात आहे. यामध्ये कोणताच भेदभाव अथवा पक्षपातीपणा केलेला नाही. गॅरंटी योजनांवर राज्यातील नागरिक समाधानी आहेत. त्यामुळे भाजपला दुसरा मुद्दा नसल्याने या योजनांबाबत अफवा पसरविली जात आहे. पराभवाची भीती सतावू लागल्याने भाजपकडून अपप्रचार केला जात आहे, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
मृणाल हेब्बाळकर यांना बहुमताने निवडून द्या
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मृणाल हेब्बाळकर यांची निवड करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. मतदारसंघाच्या विकासासाठी मृणाल हेब्बाळकर यांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सिद्धलिंग दळवाई, गंगाधर बडकुंद्री, चंद्रशेखर कोण्णूर, इम्रान तपरेर, मलकारी बंगी, कल्पना जोशी, मल्लय्या हिरेमठ, विठ्ठल रक्षी, बिराप्पा प्रधानी व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









