: मोदीसाठी पूर्ण भारतच परिवार
वृत्तसंस्था /ऋषिकेश
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडमध्ये गुरुवारी अनेक प्रचारसभांना संबोधित केले आहे. ऋषिकेश येथील सभेत बोलताना मोदींनी ब्रह्मकमळ, हुडका आणि गढवाल या तीन प्रमुख शक्तिपीठांचा उल्लेख केला आहे. देवभूमीत देवतांना आवाहन करण्याची परंपरा आहे. आज मला देखील देवतारुपी जनता जनार्दनाचे आवाहन करण्यासाठी हुकडा वाजविण्याचे सौभाग्य मिळाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस विकास आणि वारसा दोन्हींच्या विरोधात आहे. काँग्रेसने भगवान रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते हे कुणीच विसरू शकत नाही असे म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केले आहे. राम मंदिर उभारणी करणाऱ्यांना काँग्रेसचे गुन्हे माफ करत त्यांना सोहळ्याचे निमंत्रण दिले, परंतु काँग्रेसने सोहळ्यावर बहिष्कार टाकला. आता काँग्रेसने तर जाहीर स्वरुपात हिंदू धर्माच्या शक्तिचा विनाश करणार असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेस शक्ति स्वरुपा माता धारी देवी, माता चंद्रवदनी देवी, माता ज्वाल्पा देवी यांची शक्ति संपवू पाहत आहे. उत्तराखंडच्या श्रद्धेला नष्ट करण्याचा सुरू असून काँग्रेसची ही घोषणा म्हणजे आगीत तेल ओतण्याचे काम करणार आहे. उत्तराखंडच्या संस्कृतीचे रक्षण करणे आम्हा सर्वांची जबाबदारी असल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे.

हर की पौडी ही गंगामातेच्या काठावर नव्हे तर कालव्याच्या काठावर वसली असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. आता काँग्रेस गंगामातेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काँग्रेसला उत्तराखंडचे लोक धडा शिकवतील. काँग्रेससाठी एक परिवारच सर्वस्व आहे, तर मोदीसाठी पूर्ण भारतच परिवार आहे. मोदी भ्रष्टाचार दूर करू पाहत आहे तर काँग्रेस भ्रष्टांना वाचविण्यासाठी प्रयत्न चालविला असल्याची टीका मोदींनी केली आहे. देशात पूर्वी कमकुवत सरकार असताना दहशतवाद फैलावला होता. तर आता देशात मजबूत सरकार असून आम्ही जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा मोठा निर्णय घेतला. पूर्वीच्या कमकुवत सरकारांमध्ये अशाप्रकारचा निर्णय घेण्याचे साहस नव्हते. पूर्वीच्या कमकुवत सरकारमुळे सीमा मजबूत करणे शक्य झाले नव्हते. तर आता पूर्ण सीमेवर आधुनिक भुयारांची निर्मिती होत आहे. नवे रस्ते निर्माण होत आहेत. देशाकडे रायफलपासून लढाऊ विमानदेखील स्वदेशी असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.









