सहारणपूर सभेत पंतप्रधान मोदी यांचा घणाघात, भाजपच्या घवघवीत यशाचे प्रतिपादन
वृत्तसंस्था /सहारणपूर
विरोधी पक्ष जेव्हा सत्तेवर होते तेव्हा जास्तीत जास्त ’कमिशन’ त्यांनी कमाविले आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी मात्र एक ‘मिशन’ किंवा ध्येय दृष्टीसमोर ठेवून अविरत कार्य करीत आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये देशाचे चित्र असे पालटले आहे, याची पूर्ण जाणीव मतदारांना आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला घवघवीत यश मिळेल, असा ठाम विश्वास आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे जाहीर प्रचार सभेत बोलत होते. या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे ध्येय केवळ भारतीय जनता पक्षाला 370 जागा मिळू द्यायच्या नाहीत, एवढेच आहे. विरोधकांचा या निवडणुकीत पराभव होईल, ही बाब त्यांनाही मान्य झालेली आहे. जनतेचा पाठिंबा मिळत नसल्याने विरोधकांची त्रेधा उडालेली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने तर अनेकदा उमेदवार बदलून विक्रमच केला आहे. अद्याप मतदानाचा प्रथम टप्पाही पार पडलेला नाही. तरीही विरोधकांची धांदल उडालेली आहे. ते आमच्याविरोधात जिंकू शकत नाहीत, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा प्रभाव
काँग्रेसने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडाडून हल्ला चढविला. या जाहीरनाम्याच्या बऱ्याचशा भागावर मुस्लीम लीगची छाप आहे. तसेच, उरलेल्या भागावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव आहे. जाहीरनाम्यातील एकही आश्वासन देशाचे हित लक्षात घेऊन देण्यात आलेले नाही. विरोधकांचे काम केवळ आश्वासने देणे हे आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मात्र, देशाची प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल होईल, अशा प्रकारे गेल्या दहा वर्षांमध्ये राज्यकारभार केला. अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्वनिर्धारित वेळेच्या आधी आणि ठरलेल्या खर्चापेक्षाही कमी खर्चात पूर्ण केले आहेत. आधीच्या पन्नास वर्षांमध्ये झाली नव्हती, एवढी विकासकामे आमच्या 10 वर्षांमध्ये झालेली असून देश ती पहात आहे, अशी मांडणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केली.
जनतेपासून तुटली काँग्रेस
काँग्रेस पक्ष आता जनतेपासून आणि वर्तमानकाळापासून पूर्णपणे तुटलेला आहे. जनतेच्या, विशेषत: तरुणाईच्या आशाआक्षांशा आणि महत्वाकांक्षा यांच्याशी या पक्षाचे काहीही देणेघेणे आता उरलेले नाही. केवळ स्वत:चे अस्तित्व टिकवून धरणे एवढे मर्यादित उद्दिष्ट्या डोळ्यांसमोर ठेवून तो पक्ष ही निवडणूक लढवित आहे. या निवडणुकीचा परिणाम कोणता लागणार आहे याची त्या पक्षाला पूर्ण जाणीव आहे. काँग्रेस निवडणुकीपूर्वीच निराश झालेली आहे, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसला सापडेनात उमेदवार
निवडणूक लढविण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारही सापडणे कठीण झाल्याचे दिसत आहे. रायबरेली आणि अमेथी हे आपले बालेकिल्ले आहेत, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. मात्र या दोन जागांवर लढण्यासाठीही त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, ही त्या पक्षाची शोकांतिका आहे. जनतेचा काँग्रेसवर विश्वास न राहिल्याने या पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर नेतेही संभ्रमात असून काँग्रेसकडे इच्छाशक्ती उरलेली नाही, अशी मांडणी त्यांनी केली.
पक्षपात टाळून काम
सरकारी योजनांचा लाभ भारतीय जनता पक्षाच्या सरकारने समाजाच्या सर्व घटकांना होऊ दिला. लाभार्थींमध्ये पक्षपात केला नाही. ग्रामीण भागामध्ये क्रियान्वित केलेल्या योजनांमुळे कोट्यावधी गृहिणी आणि महिलांचा लाभ झाला. अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या, अशी भलावण त्यांनी केली.
पडलेला चित्रपट पुन्हा रिलीज
उत्तर प्रदेशात पुन्हा काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांची युती झालेली आहे. अशीच युती 2017 च्या विधानसभा निवडणुकीत झाली होती. त्यावेळी फ्लॉप झालेल्या युतीचा हा चित्रपट आता पुन्हा लोकांना दाखविण्यात येत आहे. मतदार या चित्रपटाची वासलात योग्यरित्या लावतीलच. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने सर्व जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.









