32 वर्षीय शशांकची गुजरातविरुद्ध अफलातून खेळी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना खूपच रोमहर्षक झाला. या सामन्यात शशांक सिंगने पंजाबला शेवटच्या षटकात थरारक विजय मिळवून दिला. शशांक क्रीझवर आला तेव्हा पंजाबच्या विजयाची शक्यता फार कमी होती. गुजरातच्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजानबने 70 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर शशांकने 29 चेंडूत नाबाद 61 धावा करत संघाला विजयाकडे नेले. शशांकच्या या मॅच विनिंग खेळीने पंजाबने शानदार विजय मिळवला. शशांकच्या या शानदार खेळीचे पंजाबच्या संघ व्यवस्थापनासह अनेक माजी खेळाडूंनी कौतुक केले आहे.
पंजाबच्या विजयानंतर शशांक म्हणाला, मी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. पण यावेळी पंजाबने मला पाचव्या क्रमांकावर मैदानात उतरवले. खेळाडू तेव्हाच कामगिरी करू शकतो जेव्हा त्याच्यावर विश्वास दाखवला जातो आणि त्याला संधी दिली जाते. यापूर्वी अनेक सामन्यात मला खेळण्याची संधी मिळाली नाही, पण गुजरातविरुद्ध संधीचे सोन्यात रुपांतर करण्याचे भाग्य मिळाल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, पंजाबची संघ मालकीण प्रीती झिंटाने सामना संपल्यानंतर शशांक सिंग आणि आशुतोष शर्मासोबत सेल्फी घेतला. तसेच दोघांचे खूप कौतुकही केले.
32 वर्षीय शशांक मुळचा छत्तीसगडमधील आहे. वडील पोलीस अधिकारी असल्याने देशभरात तो अनेक ठिकाणी राहिला आहे. 17 व्या वर्षी मुंबईत दाखल झाल्यानंतर शशांकच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मुंबईत आल्यावर शशांकला उमगले की क्रिकेट खेळणे आणि संधी मिळवणे किती कठीण आहे. 2015 मध्ये त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळण्याची संधी मिळाली. फलंदाजीसोबतच फिरकी गोलंदाजी करणाऱ्या शशांकला मुंबईसाठी 15 टी 20 आणि तीन लिस्ट ए सामने खेळण्याची संधी मिळाली. पण संघात सतत आत बाहेर होत राहिल्याने तो पुन्हा छत्तीसगडला परतला. छत्तीसगड संघात त्याला अनेक संधी मिळाल्या, खऱ्या अर्थाने त्याने शानदार कामगिरी साकारली. पुढे आयपीएलमध्ये तो सनरायजर्स हैदराबादकडून खेळला. यंदाच्या हंगामात तो पंजाब संघाकडून खेळत आहे.
सातत्याने आपल्या खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न शशांक करत असतो. गुजरातविरुद्ध शानदार कामगिरी साकारल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी त्याचे कौतुक केले आहे. अर्थात, यामागे त्याचे कठोर परिश्रम देखील आहेत. छत्तीसगड संघाकडून खेळत नसताना तो मुंबईमधील अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये तो सहभागी होत असतो. अलीकडेच झालेल्या डी वाय पाटील स्पर्धेमध्येही त्याने शानदार कामगिरी साकारली आहे. दरम्यान, शशांकचा फॉर्म असाच राहिल्या भारतीय संघाचे दरवाजे उघडल्याशिवाय राहणार नाहीत, हे तितकेच खरे आहे. अर्थात, यासाठी त्याला कठोर मेहनत व सातत्य ठेवावे लागणार आहे, हे मात्र निश्चित.









