वृत्तसंस्था/ मोनॅको
एटीपी टूरवरील येथे होणाऱ्या क्लेकोर्टवरील माँटेकार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतून स्पेनचा माजी टॉप सिडेड टेनिसपटू 37 वर्षीय राफेल नदालने दुखापतीमुळे माघार घेतली असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या उन्हाळी मोसमात नदालच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अनेक महिने टेनिसपासून अलिप्त राहावे लागले होते. नदालने अलीकडच्या कालावधीत केवळ तीन सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियन स्पर्धेतून त्याने माघार घेतली होती. नदालने आतापर्यंत 11 वेळा माँटेकार्लो मास्टर्स स्पर्धा जिंकलेली आहे. 25 मेपासून फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा सुरू होणार असून या स्पर्धेत आपण सहभागी होणार असल्याचे नदालने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.









